चिमुकल्यांना कळले पाणीटंचाई महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:18+5:302021-04-23T04:31:18+5:30
पांढरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी आहेत. यातच घटेगावच्या चिमुकल्या पाच विद्यार्थ्यांनी नाल्यावर बंधारा ...

चिमुकल्यांना कळले पाणीटंचाई महत्त्व
पांढरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी आहेत. यातच घटेगावच्या चिमुकल्या पाच विद्यार्थ्यांनी नाल्यावर बंधारा बांधून पाणी अडविण्याचा संकल्प केला. या संकल्पाला ग्रामपंचायतीच्या सदस्याने साद देत त्यांना हातभार लावला अन् बंधारा तयार झाला.
घटेगाव गावाच्या मध्यभागी एक नाला आहे. या नाल्यातून सदैव पाणी वाहत असते. त्यामुळे येथील बहुतेक नागरिक नाला परिसात भाजीपाल्याची शेती करीत असतात. या भाजीपाल्याचा पुरवठा पांढरी परिसरातील गावांत करीत असतात. या वाहत्या नाल्याच्या पाण्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी येथे रोजगार हमी योजनेंतर्गत पाणंद रस्त्याचे काम सुरू झाले होते. त्यामधून मोठ्या प्रमाणात माती, मुरूम बाहेर टाकावे लागले होते. त्यामधूनच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी येथील नाल्यावर माती, मुरूम ओबडधोबड टाकण्यात आली होती. परिणामी, पाणी अडत नव्हते. सध्या शाळा बंद आहेत. विद्यार्थी घरांमध्येच शैक्षणिक कार्य करीत आहेत. येथीलच ग्रामपंचायत सदस्य विनोद ईलमकर यांच्या गाव विकासाच्या विचारांशी प्रेरित होऊन गावातील मयूर शेंडे, जतिन शेंडे, यश शेंडे, नयन व मानव शेंडे या पाच मुलांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राखाली बहुतेक ठिकाणी टाकलेल्या माती व मुरुमाद्वारे बंधारा निर्माण केला. आज त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा दिसून येत आहे. त्याचाच परिणाम गावांमधील विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढलेली आहे. चिमुकल्यांचे हे कार्य मोठ्या माणसांनादेखील प्रेरणा देणारे आहे. त्यांचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.