‘त्या’ मुलाचा अखेर मृतदेहच आढळला

By Admin | Updated: March 21, 2017 00:55 IST2017-03-21T00:55:30+5:302017-03-21T00:55:30+5:30

आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील पुजारीटोला धरणाच्या मुख्य कालव्यात आंघोळीसाठी गेलेला उदय इंद्रदेव सोनटक्के (१२) हा मुलगा शनिवारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

The child's dead body was found | ‘त्या’ मुलाचा अखेर मृतदेहच आढळला

‘त्या’ मुलाचा अखेर मृतदेहच आढळला

कालव्यात वाहून जलसमाधी
गोंदिया : आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील पुजारीटोला धरणाच्या मुख्य कालव्यात आंघोळीसाठी गेलेला उदय इंद्रदेव सोनटक्के (१२) हा मुलगा शनिवारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा मृतदेह रविवारी, १९ मार्चला सकाळी ७ वाजता शोधकार्यादरम्यान आढळला.
कुंभारटोली येथून पुजारीटोला प्रकल्पाचा मुख्य कालवा गेलेला असून उन्हाळी धानपिकांसाठी पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उदय मित्रांसह गेला होता. आंघोळ करीत असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून नागरिकांची बचावासाठी मदत घेतली. मात्र नागरिक बचावासाठी पोहोचण्यापूर्वीच उदय वाहून गेला होता.
शनिवारी उशिरापर्यंत त्याचा पत्ता लागला नव्हता. शोधकार्यासाठी कालव्याचे पाणीदेखील बंद करण्यात आले होते. पाणी कमी होताच १९ मार्चला सकाळी तहसीलदार साहेबराव राठोड यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार पवार, मंडळ अधिकारी जी.टी. कठाणे, तलाठी पटले, पोलीस पाटील नर्मदा चुटे, कोतवाल रमेश कुंभरे व गावकऱ्यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान वाहून गेलेल्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर उदयचा मृतदेह आढळला. पोलिसांना पाचारण करून पंचनामा केल्यानंतर ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. उदयच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली. आहे. सध्या अनेक कालव्यांना उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडल्यामुळे त्यात आंघोळीचा मोह मुलांना आवरत नाही. परंतू तो जीवघेणा ठरत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The child's dead body was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.