आईच्या प्रियकराचा खून करणाऱ्या मुलांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST2021-05-12T04:30:12+5:302021-05-12T04:30:12+5:30
गोंदिया : मागील तीन-चार वर्षांपासून गावातील एका महिलेसोबत संबंध ठेवून तिला नागपूरला पळवून नेले. परत गावात आणल्यावर तिच्या तरुण ...

आईच्या प्रियकराचा खून करणाऱ्या मुलांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी
गोंदिया : मागील तीन-चार वर्षांपासून गावातील एका महिलेसोबत संबंध ठेवून तिला नागपूरला पळवून नेले. परत गावात आणल्यावर तिच्या तरुण मुलांचा छळ करणाऱ्या आईच्या प्रियकराचा मुलांनीच चाकूने भोसकून खून केल्याची घटना १० मेच्या दुपारी २.३० वाजता मुरपार येथील शेतातील झोपडीत घडली. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जयप्रकाश बसंतलाल लिल्हारे (वय ४५, रा. मुरपार) खूृन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जयप्रकाश लिल्हारे याचे मागील तीन-चार वर्षांपासून गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधापोटी त्याने तिला नागपूरला पळवून नेले. तिच्यासोबत त्याने नागपुरात दोन वर्षे काढली. मागील एक वर्षापासून तो मुरपार येथे परतल्यावर गावापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात झोपडी करून राहत होता. तो आरोपी कोमल रामचंद्र रणगिरे (३३) व रूपेश रामचंद्र रणगिरे (१९, दोन्ही रा. मुरपार) यांचा छळ करायचा. त्यामुळे त्या दोघांनी चाकूने भोसकून त्याचा खून केला. आरोपी कोमल रणगिरे याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या नावाने असलेल्या विम्याच्या पाॅलिसीवर नॉमिनी म्हणून पळून गेलेल्या महिलेचे नाव होते. रामचंद्र रणगिरे यांच्या नावाने असलेल्या तीन लाख ५० हजार रुपये विम्याचे पैसे पळून गेलेल्या आपल्या आईला मिळू नयेत म्हणून आरोपी मुलांचा प्रयत्न होता. रावणवाडी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत.