लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सामान्य प्रसूतीनंतर बाळंतीण महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १५) सकाळी ११.३० वाजता केटीएस जिल्हा रुग्णालयात घडली. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने बाळंतिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. यावरून जिल्हा रुग्णालयात काही वेळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. प्रतिभा मुकेश उके (३०, रा. आंबेडकर वॉर्ड सिंगलटोली) असे मृत्यू बाळंतीणीचे नाव आहे.
शहरातील आंबेडकर वॉर्ड सिंगलटोली येथील रहिवासी प्रतिभा मुकेश उके (३०) हिचे माहेर सडक-अर्जुनी तालुक्याच्या तिडका येथील आहे. ती प्रसूतीसाठी माहेरी तिडका येथे गेली होती. १० एप्रिलला सडक-अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात तिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. २४ तास प्रयत्न करूनही सामान्य प्रसूती होत नसल्याने तेथील डॉक्टरांनी तिला ११ एप्रिलला गोंदियाला रेफर केले. येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ११ एप्रिलला दुपारी ४:३० वाजता तिला दाखल करण्यात आले.
१२ एप्रिलच्या पहाटे २:०७ वाजता सामान्य प्रसूतीतून तिने बाळाला जन्म दिला. बाळाला गंगाबाईच्या नवजात अतिदक्षता कक्षात तर प्रतिभाला प्रसूतीपश्चात वॉर्डात दाखल करण्यात आले. परंतु प्रसूतीनंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. यादरम्यान तिची प्रकृती बिघडली.प्रकृती गंभीर पाहून तिला मुलासह १२ एप्रिलला सकाळी १० वाजता केटीएस रुग्णालयात रेफर करण्यात आले. दोन दिवस उपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर १५ एप्रिलला सकाळी ११:३२ वाजता तिचा मृत्यू झाला.
गर्भाशय फाटल्याने रक्तस्त्रावसडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रतिभा उके हिची सामान्य प्रसूती होऊ शकत नव्हती. म्हणून शस्त्रक्रियेसाठी तिला गोंदिया येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आले. परंतु येथील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती न करता सामान्य प्रसूती करण्याच्या नादात तिच्या पोटावर प्रेशर दिले. यात गर्भाशय फाटले अन् रक्तस्त्राव झाला, असा आरोप पती मुकेश विलास उके यांनी केला.
- रक्तस्त्रावानंतर दिले ६ बॉटल रक्त: प्रतिभाला रक्तस्त्राव झाल्यानंतर तिला ६ बॉटल रक्त चढवण्यात आले. त्यामुळे तिच्या हृदयावर आणि लिव्हरवर प्रेशर आले आणि तिचा मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला.
- शस्त्रक्रियेनंतर मेडिसीन कक्षात कशाला?: प्रतिभा उके यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला शस्त्रक्रिया अतिदक्षता कक्षात ठेवणे अपेक्षित असताना मेडिसीन अतिदक्षता कक्षात का ठेवण्यात आले. गंगाबाई येथील प्रसूती विभागाच्या डॉक्टरांनी आपल्या अंगावरील जवाबदारी झटकण्यासाठी तिला केटीएसला रेफर केल्याचा आरोप आहे.
"बाळंतिणीच्या मृत्यूप्रकरणी मला अजूनपर्यंत तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार आली तर त्याची चौकशी करू, त्यात जे सत्य येईल त्यानुसार आम्ही कारवाई करू,"- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या प्रसूती विभागप्रमुख राजश्री पाटील यांच्याशी या प्रकरणासंदर्भात संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.