गोंदिया: तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत चांदोरी खुर्द येथे बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर दामिनी पथक, जिल्हा महिला बाल विकास प्रकल्प, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया आणि तिरोडा पोलिसांनी संयुक्तपणे गावात पोहोचून होणारा बालविवाह नवरदेव लग्न मंडपात पोहचण्यापूर्वीच थांबविला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथे करण्यात आली.
तिरोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर जिल्हाधिकारी प्रजित नायर,पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी व तिरोडा पोलीस स्टेशन यांची चमू तयार करून प्राप्त माहितीनुसार आधारावर कारवाईची संपूर्ण तयारी केली. त्यापूर्वी विवाहातील बालक व बालिकेचे जन्म प्रमाणपत्र ग्रामसेवक यांच्याकडून प्राप्त करून घेतले. या प्रमाणपत्रानुसार बालकाचे वय पूर्ण नसल्याचे लक्षात आल्यानंतर चमू चांदोरी खुर्द गावात पोहचला.
सायंकाळी ७.३० वाजता विवाहाची संपूर्ण तयारी झालेली होती. लग्न मंडप सजलेला, डेकोरेशन, डीजे, नाच गाणे, जमलेले वऱ्हाडी, जेवणाची तयारी झालेली होती. काही वेळात लग्न लागणार, त्यावेळी दामिनी पथक व महिला बाल विकास विभागाच्या चमूने नवरदेव, नवरी त्यांच्या आई वडील आणि नातेवाईक यांची चौकशी सुरू केली. विवाहातील बालकांचे वय कमी असून बालविवाह प्रतिबंधक २००६च्या कायद्यानुसार वय पूर्ण नसल्याने हा प्रकार गुन्ह्यास पात्र आहे असे सांगितले. बालविवाह केल्यामुळे होणारे दुष्परिणाम बालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगण्यात आले. आणि मग नियोजित विवाह थांबविण्यात आला.
वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे हमीपत्र आणि संमती पत्र बालकांच्या आई-वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले. याप्रसंगी जमलेल्या वऱ्हाडी मंडळीची बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात आली.
यांनी केली कारवाई
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांच्या नेतृत्वात दामिनी पथकचे प्रभारी अधिकारी स. पो. नी. मनिषा निकम, मुकेश पटले संरक्षण अधिकारी, ज्ञानेश्वर पटले, भागवत सूर्यवंशी, रुपेश चुंडूके, धर्मेंद्र भेलावे, आशिष पुंडे, पूजा डोंगरे व कर्मचाऱ्यांनी बाल विवाह थांबविण्याची कारवाई केली.
Web Summary : Gondia police and Damini squad prevented a child marriage in Chandori Khurd. Acting on a tip, authorities intervened before the wedding ceremony could begin, halting the illegal event and counseling the families involved about the legal consequences.
Web Summary : गोंदिया पुलिस और दामिनी दस्ते ने चांदोरी खुर्द में बाल विवाह रोका। सूचना पर कार्रवाई करते हुए, अधिकारियों ने विवाह समारोह शुरू होने से पहले हस्तक्षेप किया, अवैध घटना को रोका और शामिल परिवारों को कानूनी परिणामों के बारे में परामर्श दिया।