दोन महिन्यांत १५ वेळा छत्तीसगड एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 01:58 IST2016-02-06T01:58:54+5:302016-02-06T01:58:54+5:30

मागील अनेक दिवसांपासून अप मार्गावरील बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्सप्रेस (१८२३७) सतत रद्द होत असल्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.

Chhattisgarh Express canceled 15 times in two months | दोन महिन्यांत १५ वेळा छत्तीसगड एक्स्प्रेस रद्द

दोन महिन्यांत १५ वेळा छत्तीसगड एक्स्प्रेस रद्द

प्रवाशांची गैरसोय : रेल्वेकडून धुक्याची सबब
गोंदिया : मागील अनेक दिवसांपासून अप मार्गावरील बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्सप्रेस (१८२३७) सतत रद्द होत असल्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०१६ या दोनच महिन्यांत छत्तीसगड एक्सप्रेस १५ वेळा रद्द करण्यात आली आहे. यामागे दिल्ली परिसरात धुक्याचे वातावरण जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यात तब्बल सात वेळा छत्तीसगड एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती. यात १० जानेवारी, १३, १७, २०, २४, २७ व ३१ जानेवारी अशा सात दिवसांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात ३, ७, १०, १४, १७, २१, २४ व २८ फेब्रुवारीला छत्तीसगड एक्सप्रेस रद्द राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेगाडी रद्द होण्याची पूर्वसूचना आधीच रेल्वे प्रशासनाने जाहीर केली असून यामागे दिल्ली परिसरात असलेले धुक्याचे वातावरण जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. धुक्यांमुळे चालकाला अंदाज बांधणे कठिण होत असून गाडी सुरूवातीपासूनच ८ ते १० तास उशिरा धावते.
अप मार्गावर गोंदिया रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५.४५ वाजता पॅसेंजर गाडी (५८२०५), छत्तीसगड एक्सप्रेस सायंकाळी ७.१८ वाजता व सुपरफास्ट इंटरसिटी एक्सप्रेस ८.५० वाजता सुटते. पॅसेंजरच्या वेळेपर्यंत अनेकांची कामे न आटोपल्यामुळे ते छत्तीसगड एक्सप्रेसने जाण्याच्या तयारीत असतात. मात्र वेळेवर छत्तीसगड एक्सप्रेस रद्द झाल्याचे कळल्यावर त्यांना रात्री ९ वाजतापर्यंत इंटरसिटी एक्सप्रेसची वाट पाहत बसून रहावे लागते.
या प्रकारामुळे प्रवाशांना मोठाच मनस्ताप होत असून त्रास सहन करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)

मेगा ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या प्रभावित
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मंडळांतर्गत दुर्ग-गोंदिया-कलमना (अप लाईन) खंडावर ट्रॅकच्या रखरखाव कार्यासाठी ५ फेब्रुवारीला रात्री ८.४० ते ६ फेब्रुवारीला रात्री १२.४० वाजतापर्यंत चार तासांचा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे शुक्रवार (दि.५) गाडी (१८२३९) गेवरा रोड-नागपूर शिवनाथ एक्सप्रेसला एक तास व गाडी (५८१११) टाटानगर-इतवारी पॅसेंजरला ३० मिनिटे दुर्ग स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार (दि.५) गाडी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमू, गाडी (६८७२३) डोंगरगड-गोंदिया मेमू, गाडी (६८७२९) रायपूर-डोंगरगड लोकल व शनिवार (दि.६) गाडी (६८७२४) गोंदिया-दुर्ग-रायपूर लोकल व गाडी (६८७३०) डोंगरगड-रायपूर लोकल रद्द राहणार आहेत.

Web Title: Chhattisgarh Express canceled 15 times in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.