छत्रपती, तुम्ही कधी येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST2021-02-09T04:31:51+5:302021-02-09T04:31:51+5:30
गोंदिया : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नसावा असे राज्यात एकही जिल्हास्थळ नसणार. मात्र याला जिल्ह्याचे ...

छत्रपती, तुम्ही कधी येणार?
गोंदिया : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नसावा असे राज्यात एकही जिल्हास्थळ नसणार. मात्र याला जिल्ह्याचे स्थळ असलेले गोंदिया शहर अपवाद ठरत आहे. गोंदियात छत्रपतींच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध आहे. मात्र तेथे छत्रपतींचा पुतळा अद्याप स्थापन करण्यात आला नाही. यामुळे आता शहरवासी छत्रपतींच्या पुतळ्याची वाट बघत असून छत्रपती तुम्ही कधी येणार? असा प्रश्न येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विचारत आहेत.
स्वराज्यात श्वास घेण्याचे धाडस दाखवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्वांनाच प्रेरणा मिळते. कुण्या एका समाजासाठी नसून सर्वांचे असलेले शिवाजी महाराज मराठा समाजाचे आद्य दैवत आहे. येत्या १९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत असून येथील मराठा समाजाकडून मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपतींच्या जयंतीनिमित्त चांगलाच उत्साह दिसून येत असतानाच मात्र शोकांतीका अशी की, छत्रपतींच्या पुतळ्यासाठी राखीव असलेल्या जागेवर छत्रपतींच्या पुतळ्याच्या अनुपस्थितीत ही जयंती साजरी करावी लागत आहे. राज्यात एकही शहर किंवा जिल्हास्थळ असे नाही की जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. मात्र याला जिल्ह्याचे स्थळ असलेले गोंदिया शहर अपवाद ठरत आहे. येथे छत्रपतींच्या पुतळ्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र छत्रपतींचा पुतळा अद्याप स्थापन करण्यात आलेला नाही. दरवर्षी या आरक्षित जागेवर शिवजयंती साजरी केली जाते. मात्र पुतळ्यातून छत्रपतींचे दर्शन होत नसल्याची हुरहूर मनात घेऊन येथील शहरवासी व मराठा समाजबांधव जयंती साजरी करून निघून जातात. अशात आता शहरवासी व मराठासमाजबांधवही छत्रपती तुम्ही कधी येणार? असा प्रश्न येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विचारत आहेत.
-----------------------------
पुतळ्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर
छत्रपतींच्या पुतळ्यासाठी नगर परिषदेने २० लाख रूपयांचा निधी मंजूर केला असून तसा ठराव घेतला आहे. सन २०२० मध्ये हा ठराव घेण्यात आला आहे. आता वर्ष लोटले असूनही मात्र छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा पुतळा अद्याप आरक्षित जागेवर विराजमान झालेला नाही.
....
कोट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेने निधीची तरतूद केली आहे. मात्र प्रत्यक्षात यासाठी निधी खर्च करण्यात आला नाही. पुतळा हा लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. तर सौंदर्यीकरणासाठी नगर परिषद निधी देणार आहे.
-करण चव्हाण, मुख्याधिकारी गोंदिया.