रेल्वे व बस स्थानकात प्रवाशांची तपासणी करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST2021-04-07T04:29:59+5:302021-04-07T04:29:59+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग तीव्रतेने वाढत असल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र व हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. त्यामुळे ...

रेल्वे व बस स्थानकात प्रवाशांची तपासणी करा ()
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग तीव्रतेने वाढत असल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र व हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. त्यामुळे रेल्वे व बसेसच्या माध्यमातून जिल्ह्यात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून रेल्वे व बस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजणे तसेच ऑक्सिजन लेव्हलची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.
मंगळवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत रेल्वे व बस आगारातील कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन या दोन्ही ठिकाणी आरटी-पीसीआर तपासणी करुन घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच रेल्वे व आगारात आत येण्याच्या व बाहेर जाण्याच्या दारावर प्रवाशांच्या तपासणीकरीता वैद्यकीय पथक नियुक्त करुन ज्या प्रवाशांना ताप किंवा आजार आहे, अशा प्रवाशांची तात्काळ रॅपिड ॲन्टीजेन तपासणी करणे. तसेच आवश्यक असल्यास आरटी-पीसीआर तपासणी करण्याचे निर्देश यावेळी दिले. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये नियमित पाहणी व नियंत्रण ठेवण्याकरिता नोडल अधिकारी नियुक्त करावे. येथील रेल्वे कॉलनीत हॉटस्पॉट सापडलेले आहे, त्यामुळे रेल्वे कॉलनीत कॅम्प लावण्यात यावे. तसेच रॅन्डम सॅम्पलींग सुरु करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.बी.पांचाल, आपत्ती व्यवस्क्थापन अधिकारी राजन चौबे, आगार व्यवस्थापक संजना पटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रमांक-१ खोब्रागडे, कार्यकारी अभियंता क्रमांक-२ चे अब्दुल जावेद व रेल्वे स्टेशन मास्तर उपस्थित होते.