सर्वशिक्षा विस्तार सेवेच्या नावाने फसवणूक
By Admin | Updated: April 28, 2015 00:53 IST2015-04-28T00:53:09+5:302015-04-28T00:53:09+5:30
विविध संस्थांच्या नावाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लुबाडणारे रॅकेट

सर्वशिक्षा विस्तार सेवेच्या नावाने फसवणूक
बोगस संस्थेचा प्रताप : ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बेरोजगारांना टार्गेट
आमगाव : विविध संस्थांच्या नावाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लुबाडणारे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुंबई येथील एज्युकेशनल सर्व्हिसेस या नावाने असलेल्या संस्थेविरूद्ध आमगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई येथील एज्युकेशनल सर्व्हिसेस या नावाने असलेल्या संस्थेने ‘सर्वशिक्षा विस्तार सेवा’अंतर्गत संपूर्ण राज्यात तसेच सर्व जातींसाठी शिक्षकांच्या भरतीकरिता इंटरनेटवर जाहीरात टाकण्यात आली. ही संस्था म्हणजे शासनाचाच एक विभाग आहे, असे भासविण्यासाठी ग्रामपंचायतींचा आधार घेण्यात आला आहे. शासनाच्या ‘सर्व शिक्षा अभियान’ या उपक्रमाशी नामसाधर्म्य ठेवत ‘सर्वशिक्षा विस्तार सेवाये’अंतर्गत ही पदे भरली जात असल्याचे जाहीरातीत भासविण्यात आले. यात बारावी उत्तीर्ण बेरोजगारांसाठी भारतातील सर्व गावांत शिक्षा विकासाकरिता विस्तारसेवेद्वारे दोन शिक्षक व दोन शिक्षिका यांच्या नियुक्तीकरिता अर्ज मागविण्यात आले. संस्थेबद्दल विश्वासार्हता वाटावी यासाठी सुशिक्षित बेरोजगारांनी अर्जावर आपल्या गावातील सरपंचाच्या स्वाक्षरीचे प्रपत्रही भरून द्यावे, असे नमुद केले. ग्रामपंचायतीला माध्यम बनविल्यामुळे अनेकांचा त्यावर विश्वास बसला. त्यामुळे नोकरीच्या आशेने अनेक बेरोजगारांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे धाव घेतली. मात्र प्रत्यक्षात कोणत्याच ग्रामपंचायतीला या जाहीरातीबाबत कल्पना नाही. त्याबद्दल कोणत्याच विभागाकडूनही त्यांना काही सूचना नाहीत. (शहर प्रतिनिधी)
डी.डी.च्या माध्यमातून कमाई
या अर्जासोबत प्रत्येक बेरोजगाराला ६५५ रुपयांचा डिमांड ड्रॉफ्ट ‘एज्युकेशनल सर्र्व्हिसेस, भगतसिंग नगर नं.२, लिंक रोड, गोरेगाव वेस्ट, मुंबई’ या नावे बनवून अर्ज पाठविण्यास नमुद केले होते. येत्या ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यभरातील हजारो, लाखो बेरोजगार या जाहीरातीला बळी पडून डी.डी. पाठवू शकतात. त्यामुळे आतापर्यंत या संस्थेने बेरोजगारांकडून लाखोंच्या घरात पैसे उकळले असण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागाचे हात वर
या संदर्भात शासनाकडून कोणतीही जाहिरात प्रकाशित करण्यात आली नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. एखाद्या एनजीओला सुद्धा हे काम सोपविण्यात आल्याची माहिती आपल्याकडे नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. त्यामुळे सदर एज्युकेशन सर्वीसेस नावाच्या संस्थेने दिलेली ही जाहीरात बनावट असून त्यातून केवळ बेरोजगारांची फसवणूक होत असल्याची तक्रार काही बेरोजगारांनी केली आहे. सदर संस्थेवर फौजदारी कारवाईची मागणी होत आहे.
एज्युकेशनल सर्व्हिसेसचा बनावटपणा
मुंबई येथील एज्युकेशनल सर्व्हिसेस या संस्थेने दिलेल्या जाहीरातीत शिक्षक या पदासाठी फक्त बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक योग्यता मागितली आहे, परंतु प्रत्यक्षात शिक्षक या पदासाठी संपूर्ण राज्यात आणि देशभरात शिक्षणशास्त्र पदविका व पदवी आवश्यक आहे. परंतू जास्तीत जास्त बेरोजगारांनी या जाहीरातीला बळी पडून आपल्याकडे अर्ज व डीडी पाठवावेत, हाच या संस्थेचा त्यामागील हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे.