करंट लावून चितळाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:56 IST2017-03-15T00:56:06+5:302017-03-15T00:56:06+5:30
आमगाव तालुक्याच्या पाऊलदौना येथे चितळ जातीच्या हरिणाची शिकार करून फुक्कीमेटा येथील

करंट लावून चितळाची शिकार
फुक्कीमेटातील कारवाई : एकाला अटक, तीन फरार
गोंदिया : आमगाव तालुक्याच्या पाऊलदौना येथे चितळ जातीच्या हरिणाची शिकार करून फुक्कीमेटा येथील आरोपीच्या घरी त्या चितळाचे चामडे काढताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. चार आरोपींपैकी एकाला अटक केली तर तीन जण फरार झाले आहेत. ही कारवाई सोमवारच्या पहाटे ५ वाजता करण्यात आली.
आमगाव तालुक्याच्या फुक्कीमेटा येथील आरोपी हिवराज उर्फ मधु लक्ष्मण सापके (४५) याने गावातील शत्रुघ्न सोनवाने व इतर दोन अशा चौघांनी पाऊलदौना जंगलात करंट लावून रविवारच्या रात्री एका चितळाची शिकार केली. शिकार केलेले चितळ पाऊलदौना येथे आणून आरोपी हिवराजच्या घरी रात्री त्या चितळाचे चामडे काढणे सुरु होते. हिवराजच्या घरामागील वाडीत बांबुच्या असलेल्या झाडाला हे चितळाचे शरीर टांगून चामडे काढणे सुरू होते. याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठले. परंतु वनाधिकाऱ्यांना पाहून तीन आरोपी फरार झाले तर हिवराजला अटक करण्यात वनाधिकाऱ्यांना यश आले.
हिवराज यापूर्वीही फासे घेऊन वनाधिकाऱ्यांना मिळाला होता. परंतु त्याच्याकडे मुद्देमाल न मिळाल्याने त्याला समज देऊन सोडण्यात आले होते. परंतु सराईत असलेल्या या आरोपीने शेवटी करंट लावून चितळाची शिकार केली. सदर कारवाई उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक यु.टी.बिसेन यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी डी.बी.पवार, सहायक वनक्षेत्राधिकारी एल.एस.भुते, क्षेत्र सहायक आर.जे. भांडारकर, वनरक्षक ओ.एस.बनोठे, एस.के.येरणे, आर.बी.भांडारकर, वनमजूर ओ.जी.रहांगडाले, कुवरलाल तुरकर, विश्वनाथ मेहर, राजु बावणकर यांनी केली. आरोपीविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २/१६, २/३६, ९, ३९, ९१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला दोन दिवसाची वनकोठडी मिळाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिकारीतील आरोपीने युवकाला ब्लेडने मारले
शिकार केल्यानंतर होळी जवळ जाऊन आरोपी हिवराज सापके हा शिवीगाळ करीत होता. त्याला शिवीगाळ करू नकोस असे गावातीलच दुधराम योगराज बिसेन (२६) या तरुणाने म्हटले असता त्याच्याशी वाद घालून दुधरामला ब्लेडने मारून जखमी केले. ही घटना रविवारच्या रात्री ११ वाजता घडली. हिवराज लक्ष्मण सापके (५०) रा. फुक्कीमेटा याच्याविरूध्द आमगाव पोलीस ठाण्यांत भादंविच्या कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यासाठी आमगाव पोलीस गेले होते, मात्र त्यापूर्वी वनाधिकाऱ्यांनी त्याला अटक केली होती.