डोंगर तलाव व पिंडकेपार बागेचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:06 IST2017-10-09T21:06:15+5:302017-10-09T21:06:37+5:30
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत शहरातील डोंगर तलाव व पिंडकेपार येथील बागेत विविध विकास कामे करण्यात येणार असल्याने ....

डोंगर तलाव व पिंडकेपार बागेचा होणार कायापालट
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत शहरातील डोंगर तलाव व पिंडकेपार येथील बागेत विविध विकास कामे करण्यात येणार असल्याने लवकरच डोंगर तलाव व पिंडकेपार बाग कात टाकणार आहे.
गोंदिया शहराचा सर्वच क्षेत्रात विकास होत असला तरिही हरित क्षेत्राच्या बाबतीत शहर मागासलेलेच आहे. आजघडीला शहरात सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हे एकच बाग उरले असून याशिवाय दुसरे हिरवळीचे स्थान नाही. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी सुभाष बागेचीही स्थिती काही बरी नाही. नगर परिषदेकडून बागेला रेटत चालल्याचे दिसून येत आहे. शहरातील पिंडकेपार व कुडवा येथे नवे बाग तयार केले जात आहे. मात्र सध्यातरी शहरवासीयांना मोकळ््या हवेत श्वास घेण्यासाठी दुसरी जागाच उरलेली नाही. हीच बाब हेरून केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.
यातूनच मुंबईच्या टंडन अर्बन सोल्यूशन प्रायव्हेट लिमीटेड यांच्याकडे हे काम देण्यात आले आहे. त्यानुसार या एजंसीचे कर्मचारी विकास भालेराव यांनी मध्यंतरी शहरातील डोंगरतलाव व पिंडकेपार बागेची पाहणी करून छायाचीत्र व नगर परिषदेकडून संपूर्ण माहिती घेतली होती. या एजंसीने डोंगरतलाव व पिंडकेपार बागेच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प अहवाल तयार करून नगर परिषदेकडे पाठविला होता. तर नगर परिषदेने प्रकल्प अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला होता. शासनाकडून या प्रकल्पाला मंजूरी मिळाल्याने डोंगरतलाव व पिंकडेपार बागेच्या सौंदर्यीकरणाची वाट मोकळी झाली आहे.
विशेष म्हणजे नगर परिषदेने या कामांना घेऊन आॅनलाईन निविदा काढली आहे. लवकरच या कामांसाठी काढलेली निविद उघडल्यानंतर कामांना सुरूवात होणार. ‘अमृत’च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत अशाच प्रकारे कामे होत राहिल्यास शहरात नक्कीच हरित क्षेत्र तयार होऊन त्यांचा विकास होणार.
बाग कात टाकणार
डोंगर तलाव व पिंडकेपार येथील बागेच्या सौंदर्यीकरणाचा हा प्रकल्प ७१ लाख ४९ हजार ५०० रूपयांचा आहे. यांतर्गत डोंगर तलाव परिसरात असलेल्या जागेचे सौंदर्यीकरण व वृक्षारोपण केले जाईल.
तसेच पिंकडेपार बागेतही सौंदर्यीकरण व वृक्षारोपण केले जाणार आहे. ही कामे झाल्यानंतर आजघडीला असलेली या दोन्ही स्थानांची स्थिती बदलणार व त्यांना नवे रूप मिळणार यात शंका नाही. म्हणजेच ही दोन्ही कामे झाल्यानंतर डोंगर तलाव व पिंडकेपार बाग कात टाकणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.