लहान मुलांच्या भावविश्वात होतोय बदल
By Admin | Updated: June 6, 2014 00:02 IST2014-06-06T00:02:48+5:302014-06-06T00:02:48+5:30
काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले. स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले. त्यांचे खेळ बदलले आणि अर्थातच

लहान मुलांच्या भावविश्वात होतोय बदल
गोंदिया : काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले. स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले. त्यांचे खेळ बदलले आणि अर्थातच त्यामुळे त्यांच्या जगण्यातही खूप वेगळेपणा आला आहे. पूर्वीचे खेळ भावना, संवेदनांशी संबंधित होते. निसर्गाशी जुळलेले होते. आता मात्र मुले निसर्गापासून आणि मैदानी खेळांपासून नकळतपणे दूर होत आहेत.
पूर्वी आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो, शिवाशिवी, दोरीवरच्या उड्या, फुगडी, विषामृत, लगोरी, कंचे, विटी-दांडू, टिक्कर-बिल्ला, लपाछपी, सळाक खुपसणी, भातुकली, साखळी शिवाशिवी, दोघांचा एक-एक पाय बांधून खेळणे, आंधळी कोशिंबीर, तळ्यात-मळ्यात, चंगा अष्टा, भोवरा फिरविणे असे सारे खेळ मुलांच्या बुद्धीला आणि शरीराला व्यायाम देणारे होते. आताही यातले काही खेळ मुले खेळतात, पण मुलांचा ओढा मात्र तंत्रज्ञानाशी संबंधित खेळांकडे वाढला आहे. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टय़ा आहेत. त्यात मुले सध्या वेगवेगळ्या शिबिरात तर काही घरातल्या संगणकावर गेम्स खेळण्यात व्यस्त आहेत. या सार्यांमध्ये काही गोष्टींची पुस्तकेही मुले विसरत चालली आहेत. पूर्वी बहुतेक मुलांना कॉमिक्सचे वेड होते. आता त्याऐवजी टीव्हीवरील काटरुन चॅनल पाहणे मुलांना जास्त आवडते. पालकांच्या सजगतेने मुलांना काही पारंपरिक खेळ सांगितले जात आहेत. यात दुपारी मुलांनी उन्हात न खेळता सावलीत बैठे खेळ खेळावेत हाच पालकांचा उद्देश असतो. यासंदर्भात लोकमतने शहरातल्या वेगवेगळ्या स्तरातील मुलांशी बोलून, पाहणी करून काढलेला निष्कर्ष.
पहिली पसंती क्रिकेटलाच
वय कुठलेही असो पण मुलांना क्रिकेटने फार वेड लावले आहे. प्लास्टिकच्या बॅटपासून लाकडी बॅटपर्यंत बॅट कुठलीही असो, शेजारच्या मुलांसह क्रिकेट खेळण्यात तासन्तास मुले व्यस्त आहेत. जवळपास अपार्टमेंट संस्कृतीत किंवा कॉलनीत राहणारी मुले पार्किंगच्या जागेत दुपारच्या वेळेत भन्नाट क्रिकेटमध्ये रंगली आहेत. एकूण मुलांची संख्या किती आहे. त्याप्रमाणे सम आणि विषम संख्येच्याही दोन चमू तयार करून मुले क्रिकेट खेळत आहेत. हा खेळ त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की, स्कोअर बोर्ड, पंच आदींचीही व्यवस्था मुलांनी केल्याचे दिसून येते. त्यात त्यांचा लंच टाईमही काटेकोर ठरला आहे. पालकांकडे हट्ट धरून डझनभर बॉलची व्यवस्था या मुलांनी आधीपासूनच केली आहे. कारण कुणी जोरात चेंडू टोलविला आणि एखाद्याच्या खिडकीची काच तोडून चेंडू घरात गेल्यावर तो परत मिळणार नाही, याची खात्री मुलांना आहे. चेंडू मिळाला नाही तर खेळ बंद. त्यामुळे एक चेंडू हरविला वा कुणी परत दिला नाही तर खेळात व्यत्यय येऊ नये म्हणून ही काळजी आहे. पण शहराच्या कुठल्याही भागात सहजपणे नजर टाकली तर सर्वात जास्त पसंती क्रिकेटलाच असल्याचे लक्षात येते. यातूनच छोटीमोठी भांडणे आणि कुरबुरीही वाढतात. पण पुन्हा सारे विसरून खेळ सुरू होतो.
काटरुन्स, संगणकाचे खेळ
सध्या गुगल प्लेवर मुलांसाठी प्रचंड खेळ आहेत. अनेकांकडे संगणक आणि टॅब आहेत. घराघरात स्मार्ट फोन आले आहेत. पालकांकडील किंवा भाऊ-बहिणीकडील मोबाईल रिकामा दिसला की मुले तो सोडत नाहीत. त्यावर अनेकांनी वेगवेगळे खेळ डाऊनलोड केले आहेत. मध्यमवर्गीय घरात मात्र मुले संगणकावर खेळ खेळण्यात व्यस्त आहेत. संगणकावर आवडीचा खेळ खेळण्यासाठी दोन भावंडांमध्ये भांडणे होत असल्याची स्थिती आहे. मुले घरी एकटी असल्याने यासंदर्भात पालकांचा नाईलाज होत असल्याचे दिसून येते.