सभापती व व्यापाऱ्यांत जुंपली
By Admin | Updated: December 4, 2014 23:11 IST2014-12-04T23:11:29+5:302014-12-04T23:11:29+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा सुरू असताना सभागृहात अनधिकृत प्रवेश करुन व्यापाऱ्यांनी शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सभापती काशिम जमा कुरेशी यांनी ४ डिसेंबर रोजी पोलिसांत दिली.

सभापती व व्यापाऱ्यांत जुंपली
पोलिसांत तक्रार : बाजार समितीच्या सभेत वाद
अर्जुनी/मोरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा सुरू असताना सभागृहात अनधिकृत प्रवेश करुन व्यापाऱ्यांनी शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सभापती काशिम जमा कुरेशी यांनी ४ डिसेंबर रोजी पोलिसांत दिली.
प्राप्त तक्रारीनुसार धान व्यापारी विष्णू अरुण भैय्या, सर्वेश वल्लभदास भुतडा व कमलकिशोर अमरनाथ जायस्वाल यांनी बाजार समिती संचालक मंडळाची सभा सुरु असताना विनापरवानगी सभागृहात प्रवेश केला. यावेळी सभागृहातील संचालक सत्यनारायण चांडक यांच्या माध्यमाने चर्चा सुरु केली. चर्चा करताना अश्लील व अपशब्दाचा वापर करुन शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
सदर व्यापारी अनधिकृत व्यापार करुन बाजार समितीवर दडपण व दबाव आणतात. अवैधरित्या बिना बाजार फी ने शेतमाल विक्रीस नेतात तसेच १६ ट्रक धान बाजारपेठेत विक्रीसाठी नेत असताना पकडल्या गेले. नियमाप्रमाणे या व्यापाऱ्यांकडून दुप्पट बाजार फी वसूल करण्यात आली आहे. व्यापाऱ्याने स्वत:च्या स्वाक्षरीने धनादेश दिला तरीसुद्धा धनादेशावर माझी स्वाक्षरी नाही असे सांगत व्यवहार करतात. व्यापाऱ्यांच्या या वर्तनामुळे तसेच त्यांनी मानहानी करुन जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे जिवीतास धोका असल्याची तक्रार सभापती काशिम जमा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. यासंदर्भात चौकशी करुन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)