केंद्र सरकारने सात वर्षांत जनतेला केवळ महागाईची भेट दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST2021-06-11T04:20:23+5:302021-06-11T04:20:23+5:30
गोंदिया : खोटे आणि मोठे बोलून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मागील सात वर्षांच्या काळात जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे ...

केंद्र सरकारने सात वर्षांत जनतेला केवळ महागाईची भेट दिली
गोंदिया : खोटे आणि मोठे बोलून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने मागील सात वर्षांच्या काळात जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर दरात प्रचंड वाढ करून जनतेला महागाईची भेट देण्यापलीकडे काहीच केले नाही. केवळ समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यापलीकडे काहीच केले नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे प्रतिपादन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. माजी आ. जैन म्हणाले, मोदी सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. मात्र हे आश्वासनसुद्धा हवेतच विरले. धानाच्या हमीभावात केंद्र सरकारने केवळ ७८ रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. केंद्र सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. याउलट राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले. कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात असतानासुद्धा धानाला ७०० रुपये बोनस दिला. खा. प्रफुल्ल पटेल यांनी कोरोना संक्रमण असताना दोन्ही जिल्ह्यांना ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला. तसेच दोन्ही जिल्ह्यांतील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारामुळे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. त्यामुळेच ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यास मदत झाली. दोन्ही जिल्ह्यांतील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी आ. राजेंद्र जैन यांनी दिली.