गावातील सिमेंट रस्ते ठरताहेत धोकादायक

By Admin | Updated: May 14, 2015 00:40 IST2015-05-14T00:40:29+5:302015-05-14T00:40:29+5:30

लाखो रुपये खर्च करून गावागावांमध्ये सिमेंट रस्ते तयार करण्यात आलेत.

Cement roads are considered dangerous in the village | गावातील सिमेंट रस्ते ठरताहेत धोकादायक

गावातील सिमेंट रस्ते ठरताहेत धोकादायक

नियोजनाचा अभाव : प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे निकृष्ट काम
नवेगावबांध : लाखो रुपये खर्च करून गावागावांमध्ये सिमेंट रस्ते तयार करण्यात आलेत. परंतु सदर रस्ते तुर्तास जरी सुंदर दिसत असले तरी ते योग्य नियोजनाअभावी ग्रामीण जनतेला धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे रस्ते लोकांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी, असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
गाव सुंदर दिसण्यात रस्ते व नाल्यांचे बांधकाम यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या गावातील रस्ते पक्के असावेत, अशी प्रत्येक नागरिकांची अपेक्षा असणे वास्तविक आहे. नागरिकांच्या वास्तविक अपेक्षेला मूर्त रूप देण्यासाठी गावागावांत विविध प्रकारच्या निधीतून सिमेंट रस्ते बांधण्याचा सपाटा सुरू झाला. संबंधित विभागाच्या अभियंत्याने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार कंत्राटदार या रस्त्यांचे बांधकाम करू लागले. त्यामुळे अंदाजपत्रकातील लांबी, रुंदी आणि उंचीनुसार रस्ते तयार झालेत. परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या रस्त्याची रूंदी मात्र कुणीच लक्षात घेतलेली दिसत नाही. त्यामुळे मध्यभागी सिमेंट रस्ता आणि त्यांच्या दोन्ही बाजूला नव्वद अंशाच्या कोनामध्ये असलेले सुमारे अर्धा फूट खोल असलेले खड्डे, असेच काहीसे चित्र बहुतेक गावखेड्यांमध्ये सध्या तरी दिसून येते. त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला गेले की अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
याचबरोबर पायदळ चालताना अनवधनाने बालक, वृध्द एवढेच नव्हे तर तरूणांनादेखील या रस्त्यांनी आपला इंगा दाखविला आहे. दुरूस्ती व व्यवस्थापन खर्च मुळातच कमी लागत असल्यामुळे सिमेंट रस्त्यांना प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थानी अधिक प्राधान्य दिलेले दिसून येत आहे. परंतु सिमेंट रस्ता उंच झाल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूला तयार झालेल्या खड्यांमध्ये मुरूम भरण्याचे सौजन्य मात्र कुणी सध्यातरी दाखवित नाहीत किंवा संपूर्ण रस्त्याचेच सिमेंरटीकरण करीत नाहीत.
यानंतर तरी प्रशासनाने परिसरातील नागरिकांना विश्वासात घेवून परिपूर्ण रस्ते तयार करावेत. रस्ते हे सोयीचे आहेत, ते वापरणाऱ्यांच्या गैरसोईचे ठरू नयेत, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)

सिमेंट रस्त्यांमुळे पाणी पातळी खालावली
सिमेंट रस्त्यामुळे ग्रामीण भागात देखील उष्णतेत वाढ झालेली आहे. पाणी मुरत नसल्यामुळे भूगभारतील पाण्याची पातळी खालावत आहे. रस्ते व्यवस्थित न बांधल्यामुळे पावसाळ्यात घसरण होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे नागरिक सांगतात. एकूणच सिमेंट रस्त्यांची अवस्था ही ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी झालेली आहे.

Web Title: Cement roads are considered dangerous in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.