सावधान...... कोरोनाबाधितांचा आकडा फुगतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST2021-09-22T04:33:03+5:302021-09-22T04:33:03+5:30
गोंदिया : मागील चार पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा हळूहळू वाढ होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९ वर ...

सावधान...... कोरोनाबाधितांचा आकडा फुगतोय !
गोंदिया : मागील चार पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा हळूहळू वाढ होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यात पुन्हा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे, अन्यथा पुन्हा कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे होईल.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. २१) २३३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १४६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ८७ नमुन्यांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी २ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १.६ टक्के होता. कोरोनाबाधितांच्या आकड्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पुन्हा वाढ होत असून, सर्वाधिक पाच कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात, तर गोरेगाव १ आणि आमगाव तालुक्यात ३ रुग्ण आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असलेल्या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हावासीयांना काेरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४५२०५२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २३१५५० नमुन्याची आरटीपीसीआर, तर २२०५०२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१२२० नमुने कोरोनाबाधित आढळले. ४०५०४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
...............
९६८९३६ नागरिकांचे लसीकरण
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील १२५ केंद्रांवरून लसीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. याअंतर्गत आतापर्यंत ९६८९३६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
...............
नियमांकडे दुर्लक्ष नकोच
कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायजरचा नियमित वापर करावा तसेच प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकाेरपणे पालन करण्याची गरज आहे. नियमांकडे दुर्लक्ष करू नका.