पशुपालकांना मिळणार ३९१ दुधाळू जनावरे
By Admin | Updated: May 1, 2017 00:48 IST2017-05-01T00:48:22+5:302017-05-01T00:48:22+5:30
हल्लीच्या काळात पशुसंवर्धनासाठी शासनही तत्पर असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘गावाकडे चला’

पशुपालकांना मिळणार ३९१ दुधाळू जनावरे
शेतकऱ्यांना मिळणार जोडधंदा : दोन कोटी ६८ लाखांची तरतूद
गोंदिया : हल्लीच्या काळात पशुसंवर्धनासाठी शासनही तत्पर असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘गावाकडे चला’ दिलेल्या या संदेशाला साकारण्यासाठी ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी शासनानेही लक्ष घातले आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना व पशुपालकांना शासनाकडून विशेष घटक योजनेंतर्गत दुधाळू जनावरांचे वाटप केले जात आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३९१ दुधाळू जनावरे पशुपालकांना वाटप करण्यात येणार आहेत.
जनावरांची कत्तलखान्यात रवानगी करुन त्यांच्या जागी आधूनिक औजारांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु या जनावरांची घटती संख्या पाहून चिंताजनक बाब समाजापुढे येत असल्याने जनावरांची संख्या वाढविण्याकडे शासनाचे लक्ष आहे. सोबतच शेतीमध्ये परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतमजुरांचा लोंढा शहराकडे धाव घेत आहे. शेतकरीही आपली शेती विकून मुलांना नोकरी लावून देण्याच्या नादात सैरावैरा पळत आहे. या प्रकाराला थांबविण्यासाठी तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांनी करावा म्हणून विशेष घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सन २०१६-१७ या वर्षात ३९१ दुधाळू जनावरे जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार झाली असून पंचायत समिती स्तरावरुन ही दुधाळू जनावरे लाभार्थ्यांना वाटप केली जाणार आहे. विशेष घटक योजनेंतर्गत दुधाळू जनावरांचे गट वाटपासाठी एक कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे. या एक कोटी रुपयांतून ३१३ दुधाळू जनावरे लाभार्थ्यांना वाटप केली जाणार आहे. शेळी वाटपासाठी एक कोटी सात लाख ६६ हजार रुपये मिळालेले आहे. त्यासाठी ३०० शेळी गट वाटप केले जाणार आहे. एका शेळी गटात १० बकऱ्या व एका बोकडचा समावेश असतो. ३२३ दुधाळू जनावरांना खाद्य पुरविण्यासाठी ११ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी क्षेत्र उपयोजना (टीएसपी) अंतर्गत ५० दुधाळू जनावरांसाठी १६ लाख रुपये देण्यात आले आहे. ४५ शेळी गटांसाठी १६ लाख १९ हजार रुपये देण्यात आले आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील (ओटीएसपी) च्या २९ जनावरांसाठी नऊ लाख २९ हजार रुपये मंजूर करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)