आमगावकरांच्या घशाला पडली कोरड
By Admin | Updated: March 26, 2016 01:41 IST2016-03-26T01:41:30+5:302016-03-26T01:41:30+5:30
आमगाव तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आमगाव शहरात प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेवरील ...

आमगावकरांच्या घशाला पडली कोरड
पाणी पुरवठा बंद : पर्यायी व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
आमगाव : आमगाव तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आमगाव शहरात प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेवरील पर्यायी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नदी पात्रातील पाणी संपल्याने आमगाव येथील पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून आमगावकरांच्या घशाला कोरड पडली आहे.
आमगाव ग्रामपंचायतअंतर्गत नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता ही योजना कालबाह्य ठरली होती. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंज़ुर करण्यात आली. परंतु वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करताना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्त्रोताकडे योग्य लक्ष देण्यात आले नाही. प्रशासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना घाईघाईने कार्यान्वित करुन घेतली.
आमगाव येथे नदी पात्रातून असलेल्या सिंचन विहिरींच्या माध्यमाने साठवण करुन पाण्याची उपलब्धता करण्यात येत होती. या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याने पाणी साठवणुकीसाठी नदीपात्रात मोठ््या धरणाची आवश्यकता आहे. पाणी साठवण करण्याकरिता नवीन विहिरींची गरज आहे. या मुलभूत बाबीकडे दुर्लक्ष झाले. उलट बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाण्याची पूर्तता भागविण्यात आली.
वाढती लोकसंख्या व पाण्याच्या मागणीतील वाढ लक्षात घेता बनगाव प्रादेशिक पुरवठा योजनेतील पाणी, मागणीवरील खर्च भागत नसल्याने प्रशासकांनी पाणी पुरवठा बंद केला व पूर्ववत नदी पात्रातील साठवणुकीतील पाण्याने नागरिकांची तहानभागविण्यात आली. परंतु नदीपात्रातील पाणी संपल्याने आमगाव येथे मागील चार दिवसांपासून खंडीत पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
नदीपात्रात धरण बांधकाम व्हावे
नदीपात्रातून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला सक्षम करण्यासाठी नदीपात्रात धरणाची आवश्यकता आहे. पावसाळ्यातील पाणी साठवणमुळे या भागात सिंचन वाढेल. तसेच नवीन विहीर बांधकामामुळे पाणी पुरवठ्यासाठी बळ मिळेल. या दृष्टीने प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. नदीपात्रात धरण व विहीर बांधकामाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
स्थायी प्रशासनाअभावी अडचणी
आमगाव येथील नागरिकांच्या नगर परिषदेच्या मागणीची योग्य दखल घेवून शासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. आमगाव ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा बहाल केला होता, परंतु नागरिकांनी न्यायालयीन प्रक्रियेत नगरपंचायतचा निर्णय रद्द केला. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतचा कारभार सुरू झाला. मागील दीड वर्षापासून प्रशासकांचा कारभार होता. अस्थिर प्रशासनामुळे गावातील विकास कामे तसेच पाणी पुरवठा योजनेवरील कामे ठप्प पडली आहेत. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्थायी प्रशासनासाठी व्यवस्था कधी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.