आठ कारवायांत पकडली ३० लाखांची रोकड
By Admin | Updated: October 7, 2014 23:35 IST2014-10-07T23:35:13+5:302014-10-07T23:35:13+5:30
अलीकडे निवडणुकांतील पैशांचा वाढत खेळ लक्षात घेता निवडणूक विभागाने यावर डोळा ठेवण्यासाठी भरारी पथकं तयार केली आहेत. या पथकांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारीही

आठ कारवायांत पकडली ३० लाखांची रोकड
भरारी पथकांची कारवाई : पैसा कुणाचा? चौकशी सुरू
गोंदिया : अलीकडे निवडणुकांतील पैशांचा वाढत खेळ लक्षात घेता निवडणूक विभागाने यावर डोळा ठेवण्यासाठी भरारी पथकं तयार केली आहेत. या पथकांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारीही उत्कृष्टरित्या पार पाडली असून आतापर्यंत आठ कारवायांत ३० लाख २९ हजार ८०० रूपयांची रोकड जप्त केली आहे. पकडण्यात आलेली ही रक्कम जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्रांत करण्यात आलेल्या कारवाईतील आहे.
निवडणुकांमध्ये वापरल्या जात असलेला पैसा आणि दारू पुरवठ्यातून मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न केला जातो. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी उमेदवार आज साम, दाम, दंड व भेद या चारही अस्त्रांचा वापर करतात. त्यात विशेषत: मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवार पैसा ओतताना दिसत आहे.
या सर्व प्रकारांवर आळा बसावा यासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी तीन भरारी पथक तयार केले आहेत. सर्व गैरप्रकारांवर नजर ठेऊन त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.
या पथकांनी तीन विधानसभा क्षेत्रांत आतापर्यंत पैशाच्या हिशेब न देऊ शकणारी आठ वाहने पकडून त्यातील रोकड जप्त केली आहे. यात १९ सप्टेंबर रोजी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम अदासी तांडा येथे पथकाने एका गाडीतून ५.५० लाखांची रोकड जप्त केली. तर त्याच दिवशी कोरणी नाका येथे गाडीतून ४.९७ लाखांची रोकड पकडण्यात आली. २३ सप्टेंबर रोजी पथकाने तिरोडा विधानसभा क्षेत्रात तिरोडा-तुमसर मार्गावर नाकाबंदी दरम्यान तीन लाख तर आमगाव विधानसभा क्षेत्रातील हरदोली नाका येथे १० लाखांची रोकड पकडली. २५ सप्टेंबर रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव दोन लाख तर २७ सप्टेंबर रोजी ७७ हजार ८०० रूपयांची रोकड पथकाने पकडली. २८ सप्टेंबर रोजी आमगाव विधानसभा क्षेत्रातील देवरी येथे १.७८ लाखांची तर १ आॅक्टोबर रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव येथे २.२७ लाख रूपयांची रोकड पथकाने गाडीतून जप्त केली.
अशाप्रकारे एकूण आठ कारवायांतून पथकाने ३० लाखांची रोकड पकडली असून सदर रक्कम संबंधित पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. संबंधित ठाण्याच्या माध्यमातून ही रोकड नेत असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. यातील रकमेचा खुलासा मिळाल्यास ती रक्कम परत केली जाणार असून अन्यथा ती रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)