उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन आणि कोलांटउड्यांंचा दिवस
By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:18:20+5:302014-09-27T23:18:20+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी अनेक प्रमुख उमेदवारांमध्ये शक्तीप्रदर्शनासाठी चढाओढ लागली होती. उमेदवारी दाखल करताना

उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन आणि कोलांटउड्यांंचा दिवस
११५ उमेदवारांचे नामांकन : तिकीट कापताच अनेकांची पळापळी
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी अनेक प्रमुख उमेदवारांमध्ये शक्तीप्रदर्शनासाठी चढाओढ लागली होती. उमेदवारी दाखल करताना मोठी रॅली काढत माहौल बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्यातील चार मतदार संघात एकूण ११५ उमेदवारांनी १८६ नामांकन दाखल केले. त्यात सर्वाधिक चढाओढ गोंदियात दिसून आली.
गोंदिया मतदार संघात चार दिवसात ४३ उमेदवारांनी ७७ नामांकन, तिरोड्यात २६ उमेदवारांनी ४४ नामांकन, आमगावात ११ उमेदवारांनी १६ नामांकन तर अर्जुनी मोरगाव मतदार संघात ३५ उमेदवारांनी ४९ नामांकन दाखल केले.
युती आणि आघाडीची भट्टी शेवटच्या क्षणी न जमल्यामुळे बेसावध असलेल्या काही पक्षांना सशक्त उमेदवार शोधणे कठीण झाले होते. यातच सर्वाधिक इच्छुकांची संख्या असणाऱ्या भाजपात उमेदवारीची आस लावून बसलेल्यांनी निराश न होता इतर पक्षांकडून आपलेली ‘आॅफर’ स्वीकारून संधीचे सोने करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यात त्यांना किती यश येते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
शनिवारी नामांकन दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये गोंदियातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक उर्फ गप्पू गुप्ता, बहुजन समाज पार्टीचे योगेश उर्फ मामा बन्सोड, आमगाव मतदार संघात भाजपचे संजय पुराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश ताराम, शिवसेनेचे मुलचंद गावराने आणि बसपाच्या शारदा उईके, तिरोड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी तुरकर, भाजपचे विजय रहांगडाले, शिवसेनेचे पंचम बिसेन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पी.जी.कटरे, बसपाचे दीपक हिरापुरे आणि दिलीप बन्सोड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.
अर्जुनी मोरगाव मतदार संघात भाजपाचे आ.राजकुमार बडोले, काँग्रेसकडून राजेश नंदागवळी, बसपाचे बी.के.मेश्राम तसेच काँग्रेस बंडखोर रत्नदीप दहीवले व राकाँचे बंडखोर मिलन राऊत यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले आहे.
यावेळी भाजपाच्या चार इच्छुकांनी इतर पक्षांमध्ये कोलांटउडी घेऊन त्यांच्या तिकीटवर नामांकन भरले आहे. त्यात तिरोडा मतदार संघातून भाजपचे माजी जि.प.उपाध्यक्ष पंचम बिसेन यांनी शिवसेनेच्या तिकीटवर, आमगाव विधानसभा मतदार संघातून गेल्यावेळी भाजपचे उमेदवार असलेले रमेश ताराम यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटवर नामांकन भरले.
याच मतदार संघात भाजपचे सदस्य मुलचंद गावराणे यांनी शिवसेनेचा झेंडा पकडत त्यांच्या तिकीटवर उमेदवारी दाखल केली आहे. अर्जुनी मोरगाव मतदार संघात भाजपच्या जि.प.सदस्य किरण कांबळे यांनी शिवसेनेच्या तिकीटवर नामांकन दाखल केले. (जिल्हा प्रतिनिधी)