आश्रमशाळेची मान्यता रद्द करा
By Admin | Updated: February 25, 2017 00:27 IST2017-02-25T00:27:51+5:302017-02-25T00:27:51+5:30
देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या मकरधोकडा येथील स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेतील

आश्रमशाळेची मान्यता रद्द करा
पत्रपरिषद : आदिवासी संघटनांचा आंदोलनाचा इशारा
गोंदिया : देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या मकरधोकडा येथील स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेतील वर्ग नववीच्या विद्यार्थिनीवर तेथील चौकीदाराने अत्याचार केला. शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सदर आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी आदिवासींच्या विविध संघटनांनी गोंदियात घेतलेल्या पत्रपरिषदेत केली.
पत्रपरिषदेत अॅड. विवेक धुर्वे, माजी पं.स. सदस्य जगतकुमार नेताम, आॅल इंडिया आदिवासी संघटनेचे चेतन उईके, बिरसा ब्रिगेडचे जिल्हा संघटक मधू दिहारी, देवरी आदिवासी संघटनेचे लोकनाथ तितराम, आदिवासी गोंड सेवाभावी संस्था देवरीचे तालुका सचिव नामदेव आचले, आदिवासी कर्मचारी संघटनेचे युवराज कोल्हारे, आदिवासी कर्मचारी संघटनेचे सहसचिव रमेश उईके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी विद्यार्थ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याने या आश्रमशाळेची मान्यता ६ जुलै २०१३ रोजी रद्द करण्यात आली. मात्र पुन्हा २६ मे २०१४ रोजी मान्यता देण्यात आल्याने शाळा पूर्ववत सुरू झाली. त्यानंतरही विद्यार्थी मृत्यूचे सत्र थांबलेले नाही.
बलात्कार पीडित विद्यार्थिनी दि.१८ तारेखला शाळेत हजर असल्यामुळे हजेरी रजिष्टवर ‘पी’ असे नोंदविले होते. मात्र नंतर ते ओव्हरराईट करून गैरहजर दाखविण्यासाठी ‘ए’ दाखविण्यात आले. त्या मुलीला घटनेनंतर तिच्या मामाकडे पाठविल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या प्रकारामुळे मुख्याध्यापक, संस्थापक, शाळा व्यवस्थापन सदर प्रकरण दडपण्याच्या तयारीत होते, असा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.
शाळा व्यवस्थापन, संस्थाचालक, मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी घटनेचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा. मुख्याध्यापक पी.एम. उकरे यांना बडतर्फ करावे, शाळेची मान्यता रद्द करून बंद करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी सर्व आदिवासी संघटना देवरी येथील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. (प्रतिनिधी)