३०० वॉरियर्सच्या लसीकरणाने होणार मोहिमेचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST2021-01-16T04:34:18+5:302021-01-16T04:34:18+5:30
गोंदिया : अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला शनिवारी (दि.१६) सुरुवात होत आहे. ...

३०० वॉरियर्सच्या लसीकरणाने होणार मोहिमेचा श्रीगणेशा
गोंदिया : अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला शनिवारी (दि.१६) सुरुवात होत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ३ केंद्रांवर ३०० कोरोना वॉरियर्सला लसीकरण करून मोहिमेचा श्रीगणेशा केला जाणार आहे.जिल्ह्यात लसीकरणासाठी ८४२८ फ्रंट लाईन कोरोना वॉरियर्सची निवड करण्यात आली आहे.
कोरोनाने अवघ्या जगालाच झपाटले असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांना त्याने आपल्या कवेत घेतले असून लाखो नागरिकांचा जीवही घेतला आहे. मागील वर्ष कोरोनाच्या विळख्यातच गेले असतानाच सन २०२१ मध्ये भारतात निर्मित दोन लस विकसित करण्यात आल्या असून त्यांना केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. या लसी आता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करवून दिल्या जाणार असून यासाठी शनिवारपासून (दि.१६) अवघ्या जागातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत जिल्ह्याला १० हजार २६० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तर लसीकरणासाठी जिल्ह्यातील ८४२८ फ्रंट लाईन कोरोना वॉरियर्सची निवड करण्यात आली आहे. त्यांनाच सर्वप्रथम लस दिली जाणार आहे.
शनिवारपासून होत असलेल्या या लसीकरणासाठी १४ लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून पहिल्या दिवशी गोंदिया वैद्यकीय महाविद्यालय, तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात तर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी १०० प्रमाणे ३०० कोरोना वॉरियर्सला लस दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाच्या या मोहिमेसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर को-विन ॲपद्वारे ही लसीकरणाची प्रक्रिया राबविली जाणार असल्याने शुक्रवारी (दि.१५) येथील टाटा एंट्री ऑपरेटर्सलाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.