गोंदियात कर वसुलीसाठी वॉर्डावॉर्डात कॅम्प

By Admin | Updated: February 25, 2017 00:18 IST2017-02-25T00:18:02+5:302017-02-25T00:18:02+5:30

कर भरणा करण्यासाठी शहरवासीयांना सुविधा व्हावी यासाठी नगर परिषदेने टॅक्स रिकव्हरी कॅम्प हा नवा उपक्रम सुरू केला आहे.

Camp in WardaWood for Gondiya tax collection | गोंदियात कर वसुलीसाठी वॉर्डावॉर्डात कॅम्प

गोंदियात कर वसुलीसाठी वॉर्डावॉर्डात कॅम्प

नगर परिषदेचा उपक्रम : पालिकेच्या शाळांचा वापर
गोंदिया : कर भरणा करण्यासाठी शहरवासीयांना सुविधा व्हावी यासाठी नगर परिषदेने टॅक्स रिकव्हरी कॅम्प हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील आठ नगर परिषद शाळांत हे टॅक्स रिकव्हरी कॅम्प लावण्यात आले आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडील टॅक्स या शाळेत जमा करावे असे आवाहन नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
नगर परिषदेला कर स्वरूपात येणाऱ्या उत्पन्नातूनच बहुतांश कामे करावी लागतात व नगर परिषदेचे आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्त्रोतच कर आहे. मात्र गोंदिया नगर परिषदेत ५० टक्के पेक्षाही कमी कर वसुली होत असल्याने नगर परिषदेला नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागते. अशात काहीनाकाही मार्ग काढून नगर परिषद आपली गरज भागवित असते. मात्र अशात शहराचा विकास करणे कठीण आहे. नगर परिषदेच्या तिजोरीत पैसा नसल्यास नगर परिषदेच्या शहराच्या विकासासाठी काही नवे करणे शक्य नाही.
अशात जास्तीत जास्त कर वसुली होणे गरजेचे असून याला शहरवासीयांनीही सहकार्य करणे तेवढेच गरजेचे आहे. यंदा नगर परिषदेला येत्या ३१ मार्च पर्यंत सहा कोटी ८२ लाख रूपयांची कर वसुलीचे टार्गेट आहे. त्यादृष्टीने कर वसुलीसाठी कर वसुली विभागाचे कर्मचारी नगर परिषद प्रशासन कामाला लागले आहे. जास्तीत जास्त कर वसुली आल्यास नगर परिषदेकडून शहराच्या विकासावर हा पैसा खर्च करता येणार आहे. यासाठीच नगर परिषदेकडून कर वसुलीवर जोर दिला जात आहे.
यात शहरवासीयांच्या सुविधेसाठी आता नगर परिषदेने टॅक्स रिकव्हरी कॅम्प हा नवा प्रयोग सुरू केला आहे. यांतर्गत शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या शाळांत हे कॅम्प लावण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये नगर परिषदेच्या कर वसुली विभागातील कर्मचारी उपस्थित राहणार असून नागरिकांचे कर स्वीकारून त्यांना पावती देतील. या कॅम्पमुळे नागरिकांना आता नगर परिषद कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही. त्यांच्या प्रभागातील नगर परिषद शाळेतील कॅम्पमध्ये जावून त्यांना कराचा भरणा करता येणार आहे. (शहर प्रतिनिधी)

शहरात लावले आठ कॅम्प
नगर परिषदेने शहरात आठ कॅम्प लावले आहेत. शहरातील विविध भागात असलेल्या नगर परिषदेच्या शाळांमध्ये हे कॅम्प लावण्यात आले आहेत. या कॅम्प मध्ये नगर परिषदेच्या तीन-चार कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. २३ तारखेपासून हे कॅम्प सुरू करण्यात आले असून आता २५ व २६ तारखेपर्यंत हे कॅम्प सुरू राहणार आहेत. याबाबत शहरवासीयांना माहिती व्हावी यासाठी नगर परिषदेने चार वाहनांतून शहरात मुनादी सुरू केली आहे.

Web Title: Camp in WardaWood for Gondiya tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.