न.प.ची पोटनिवडणूक १७ ला
By Admin | Updated: March 13, 2016 02:11 IST2016-03-13T02:11:03+5:302016-03-13T02:11:03+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्याच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

न.प.ची पोटनिवडणूक १७ ला
कार्यक्रम जाहीर : प्रभाग १ साठी होणार मतदान
गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्याच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात येत्या १७ एप्रिल रोजी मतदान करण्यात येणार असून १८ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीला घेऊन आता राजकीय पक्ष व इच्छूकांच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक अनिल पांडे यांचे महिनाभरापूर्वी अपघाती निधन झाल्याने त्यांचे पद रिक्त झाले आहे. प्रभाग क्रमांक १ मधील (ड) सर्वसाधारण प्रवर्गातून ते निवडून आले होते. आता या प्रभागातील एक जागा रिक्त झाल्याने या जागेसाठी पोट निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषदेला ९ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या पोट निवडणुकीकरिता १० मार्च रोजी अंतीम मतदार प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवाय आता या पोटनिवडणुकीचा पूर्ण कार्यक्रमच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
शहरातील प्रभाग १ मधूनच नगर परिषदेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपला खाता उघडला होता. प्रभागवासीयांनी भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना कौल देत नगर परिषदेत पाठविले होते. मात्र पांडे यांच्या अपघाती निधनाने प्रभागातील त्यांची जागा रिक्त झाली. परिणामी ही जागा भरून काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक लावली आहे.
या जागेसाठी आता इच्छूकांकडून तसेच राजकीय पक्षांकडूनही हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला आपली ही जागा कायम ठेवता येते काय हे येणारा काळच स्पष्ट करेल. (शहर प्रतिनिधी)