बिरसी-गोंदिया मार्गावर व्यवसाय ठप्प

By Admin | Updated: October 5, 2014 23:07 IST2014-10-05T23:07:38+5:302014-10-05T23:07:38+5:30

बिरसी विमानतळावरून कारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदियात आगमन झाले. यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी रावणवाडी पासून ते गोदियापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानी

Business jam on the Birsi-Gondiya Road | बिरसी-गोंदिया मार्गावर व्यवसाय ठप्प

बिरसी-गोंदिया मार्गावर व्यवसाय ठप्प

रावणवाडी : बिरसी विमानतळावरून कारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदियात आगमन झाले. यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी रावणवाडी पासून ते गोदियापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानी सकाळपासूनच बंद पाडल्या होत्या. यामुळे मात्र या मार्गावरील व्यावसायिकांचा अख्खा दिवसाचा व्यापार ठप्प पडला होता.
पंतप्रधान मोदींचे खासगी विमानाने बिरसी विमानतळावर आगमन होणार होते. त्यानंतर तेथून कारने ते सभास्थळी जाऊन कारनेच परत विमानतळावर येऊन विमानाने निघून जाणार असा त्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानुसार पोलीस विभागाने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिरसी पासून गोंदिया पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यासाठी विभागाने शनिवारीच (दि.४) व्यवसायीकांना पत्र दिले होते.
याशिवाय रावणवाडी येथे मुख्य चौकात जुळणारे बालाघाट, बिरसी व दासगाव हे तिन्ही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. एवढेच नव्हे तर राज्य परिवहन मंडळाच्या बसेसनाही प्रवासी निवाऱ्यापासून २०० मिटर अंतरावर थांबविले जात होते. त्यामुळे प्रवाशांनाही मंत्री महोदयांच्या दौऱ्याचा फटका सहन करावा लागला. तर आॅटो व काळीपिवळी प्रवासी वाहनांनाही या मार्गावरून वाहतूक बंद ठेवल्याने ही वाहने दिसून आली नाही.
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी येत असल्याने बांधकाम विभागाने याचा धसका घेत सकाळपासून बिरसी पासून ते गोदियापर्यंत रस्त्यावरील खड्यात टाकण्यात आलेले मुरूम काढून त्यावर डांबरीकरण करण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले. अचानक दिसून आलेल्या या परिवर्तनाबद्दल परिसरातील नागरिकांनी मात्र रोष व्यक्त केला.
शिवाय बिरसी ते गोंदिया या दरम्यान सुमारे ५०० दुकानी असून मंत्र्यांच्या आगमन होत असल्यास पोलीस विभागाकडून या दुकानदारांना दुकानी बंद ठेवण्यात आदेश दिले जाते. यामुळे मात्र या गरीब व्यवसायीकांचा व्यवसाय मार खातो. अशात मंत्र्यांनी थेट बिरसी येथून हेलीकॉप्टरनेच गोंदियाला जावे. किमान यामुळे येथील व्यवसायीकांना फटका सहन करावा लागणार नाही अशा प्रतिक्रियाही येथील व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.
बिरसी विमानतळावर आतापर्यंत अनेक वेळा व्हीआयपी मंडळी येऊन गेली. मात्र पंतप्रधानांनी या विमानतळावर उतरण्याची आणि कारने गोंदियाला येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकताही दिसली. (वार्ताहर)

Web Title: Business jam on the Birsi-Gondiya Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.