सालेकसात झाडीबोलीची गुंज
By Admin | Updated: January 10, 2015 22:56 IST2015-01-10T22:56:25+5:302015-01-10T22:56:25+5:30
झाडीबोली साहित्याला जिवंत ठेवण्यासोबतच या परिसरात रूजविण्याचा संकल्प करीत सालेकसा येथे २२ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाला शनिवारी सुरूवात झाली.

सालेकसात झाडीबोलीची गुंज
२२ वे साहित्य संमेलन : ग्रंथदिंडी, कलाविष्कारांनी वेधले सर्वांचे लक्ष
सालेकसा (स्व.हरिदास बडोले साहित्यनगरी : झाडीबोली साहित्याला जिवंत ठेवण्यासोबतच या परिसरात रूजविण्याचा संकल्प करीत सालेकसा येथे २२ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाला शनिवारी सुरूवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक धनराज ओक आहेत.
स्व.हरिदास बडोले साहित्य नगरी असे नामकरण केलेल्या खिलेश महाविद्यालयाच्या प्रांगणात या संमेलनाचे उद्घाटन आ.संजय पुराम यांच्या हस्ते दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राकेश शर्मा, लखनसिंह कटरे, प्रतिभाताई परिहार, खेमराज साखरे, लोकराम शेंडे, राम महाजन, डॉ.हरिश्चंद्र बोरकर, विष्णू भेंडारकर, डोमा कापगते, हिरामण लंजे आदी साहित्यिक मंडळी प्रामुख्याने मंचावर विराजमान होती. झाडीबोली साहित्य मंडळ, सालेकसा यांच्या पुढाकाराने हे संमेलन दोन दिवस चालणार आहे.
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक खेमराज साखरे यांनी, संचालन चंद्रकुमार बहेकार यांनी तर आभार प्रदर्शन खुशाल साखरे यांनी केले.
पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांसाठी प्रा.खुशाल साखरे, प्रा.महेंद्रकुमार वैद्य, प्रा.अश्विन खांडेकर, पवन पाथोडे, प्रा.राकेश रोकडे, लोकेश नागरिकर, महेश क्षीरसागर, प्रा.उमेश वलथरे, दिलीप सिंद्राम, आचल शहारे, डेविड मेश्राम, रंजूताई उके, उमाशंकर तरोणे, तुकाराम शेंडे, आरती बघेले, सरिता बिसेन, गीता राणे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
पुस्तकांचे प्रकाशन
झाडीबोली साहित्य संमेलनात झाडीबोलीतील लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यात प्राणज्योत (पवन पाथोडे), माझी जीवन नौका (डोमा कापगते), श्रद्धा सुमन भजनावली (डोमा कापगते), सोन्याचा पिंजरा (हिरामण लंजे), चिंतन बुढापे का (धनराज ओक), मोतीराम बाबा अभंगावली (सुभाष धकाते), सावित्रीच्या लेकी (शशिकला गावतुरे), साजोनी (सुखदेव चौथाले) या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
साहित्यिकांचा मानसन्मान
काही साहित्यिकांचा सत्कारही याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात गजानंद बाडगे कविता पुरस्कार बंडोपंत बोडेकर (खंजरी) यांना देण्यात आला. घनश्याम डोंगरे शोध पुरस्कार चंद्रपूरचे डॉ.शाम मोहरकर (झाडीपट्टी रंगभूमी) यांना व द.सा. बोरकर आत्मकथा पुरस्कार अंजनाबाई खुणे यांच्या झाडीचा झेलना या पुस्तकांना देण्यात आला.