बसस्थानक परिसर घाणीच्या विळख्यात
By Admin | Updated: September 11, 2015 02:07 IST2015-09-11T02:07:19+5:302015-09-11T02:07:19+5:30
जिल्हयातील मुख्य बसस्थानक परिसर घाणीने माखलेला आहे. प्रचंड दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे.

बसस्थानक परिसर घाणीच्या विळख्यात
जुना बसस्थानकाची दुरवस्था : दुर्गंधीमुळे रहदारीवरही परिणाम, मानसिकता बदलण्याची गरज
भंडारा : जिल्हयातील मुख्य बसस्थानक परिसर घाणीने माखलेला आहे. प्रचंड दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय असा प्रश्न नागरिक विचारित आहेत.
भंडारा जिल्हयातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. विशेष म्हणजे जिल्हयाचे मुख्यालय असल्याने अनौपचारिकपणे बसस्थानकाचे क्षेत्रफळ मोठे असणे स्वाभाविक आहे. दशकभरापूर्वी नविन बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानक चौक ते बसस्थानकाच्या आऊटर मार्गापर्यंतचा भाग बसस्थानक परिसर म्हणून ओळखला जातो. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे.
पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा राज्य मार्ग आहे. दक्षिण दिशेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल व जलतरण तलावाचा परिसर आहे. तर पूर्व दिशेला झोपडपट्टीचा परिसर आहे.
नविन बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुना बसस्थानकाच्या परिसरातून रसना लॉजकडे जाण्यासाठी एक लहान गल्ली होती. याच गल्लीतून मोठा बाजार परिसरातून येणारे प्रवासी आजही येतात. मात्र या परिसरात प्रचंड दुर्गंधी आहे. जागोजागी कचरा साचलेला आहे. काही वर्षांपूर्वीच प्लाझा नामक व्यापारी संकुलाची भव्य इमारत बांधण्यात आली.
त्यामुळे जुन्या बसस्थानकाचा भाग दाबल्या गेला. तद्वतच जुना बसस्थानक व नविन बसस्थानक वेगवेगळे असल्यासारखे वाटू लागले. विशेष म्हणजे हा सर्व परिसर एकच आहे. जुन्या बसस्थानकातील ओट्यांची दुरावस्था झाली आहे. शेळ्या मेंढा व अन्य बेवारस जनावरे येथे फिरत असतात.
या जागेचा खुलेआम लघुशंकेसाठी व शौच करण्यासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळेही दुर्गंधीत वाढ झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य प्रमाणात नालीचे बांधकाम नसल्याने दिवसरात्र पाणी वाहत राहते. उघड्यावरच लघूशंका केली जात असल्याने येथून जाणाऱ्या प्रवाशांना तोंडावर रुमालच घेवून जावे लागते.
बसस्थानक परिसराला लागून असलेल्या इमारती व अन्य दूकानांमधील कचरा पेटीत न घालता तो थेट जुन्या बसस्थानक परिसरात सर्रासपणे फेकला जातो. पंतप्रधानानी संपूर्ण भारतभर स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणात वेळोवेळी उपक्रमही केले जातात.
मात्र बसस्थानक परिसरातील स्वच्छतेच्या बाबतीत आगाराने अद्यापही दखल घेतलेली नाही. दुर्गंधीमुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे असतानाही स्वच्छतेची मोहिम का राबविण्यात येत नाही अशा सवाल नागरिकांच्या मनात घोंघावत आहे.
विशेष म्हणजे बसस्थानक परिसरातील डांबरीकरण उघडले असल्याने या समस्येत अजून भर पडली आहे. गिट्टी उखडलेली असल्याने बसच्या चाकाखाली सापडून गिट्टी केव्हा प्रवाश्यांच्या अंगावर येईल याचा नेम नाही. मध्यंतरी आगार प्रशासनाने भरण घालून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पावसाळयात हा प्रयत्न सपेशल फेल ठरला आहे. भंडारा बसस्थानक आगार प्रशासन या समस्यांकडे लक्ष देईल काय? व सुधारणा होईल काय? असा प्रश्न वारंवार विचारित आहे. व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)