बसस्थानक ठरत आहे शोभेची वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:00+5:302021-02-08T04:26:00+5:30
यापूर्वी लाभ घेणारे पात्र नाहीत आमगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात ...

बसस्थानक ठरत आहे शोभेची वास्तू
यापूर्वी लाभ घेणारे पात्र नाहीत
आमगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. तालुक्याला २ रोपवाटिकांचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. यापूर्वी शासन योजनेचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटिकाधारक शासन योजनेचा लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटिका राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोखरा किंवा इतर योजनांतून संरक्षित शेती शेडनेट व हरितगृह घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार नाहीत, असे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
परसबागेतून मिळणार महिलांना रोजगार
तिरोडा : सेंद्रिय भाजीपाल्याची वाढती मागणी व त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने याच बाबीला हेरून अदानी फाउंडेशन तिरोडाद्वारा ग्राम बेरडीपार येथील ५० महिलांना परसबाग लागवडीचे प्रात्यक्षिक देऊन भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे आता महिलांना परसबागेतूनही रोजगार मिळणार आहे.
ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले; परंतु यापैकी अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
गोंदिया : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे, ग्राहक, व्यापाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. सातत्याने हा प्रश्न उपस्थित होत असतानाही प्रशासनाकडून तो सोडविला गेला नाही.
भटक्या समाजाची समस्या संपता संपेना
आमगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे लोहार समाज भटकंती करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. यासाठी गावोगावी फिरून मिळालेल्या पैशातून ते आपला उदरनिर्वाह करतात.
तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच
सडक-अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्ती गाव अभियान योजनेला गावा-गावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने या अभिनव योजनेचा अनेक गावांत फज्जा उडाला आहे.
पिपरिया-चांदोरी खुर्द रस्ता अपघाताला आमंत्रण
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी जि.प. क्षेत्रातील शेवटच्या टोकावरील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिपरिया चांदोरी खुर्द- खैरलांजी पिपरिया रस्ता खराब झाल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा निधी काम न करता गहाळ केला. फक्त कागदावर काम दाखविण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. जि.प.च्या अभियंत्यांनी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांंना त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा रामभरोसे
गोरेगाव : ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णांना सुलभ व जलदसेवा द्यावी हा शासनाचा उदात्त हेतू आहे. मात्र, असे जिल्ह्यात होताना दिसून येत नाही.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
गोरेगाव : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तात्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. याकडे बँक प्रशासनाने लक्ष देऊन सर्वसामान्यांची लूट थांबवावी.
दिवसाही सुरू असतात पथदिवे
गोरेगाव : जिल्हास्थळ असलेल्या भंडारा शहरात नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगर परिषदेला नाहकच अधिकच्या विजेचा भुर्दंड सोसावा असतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
घरकुल अनुदान पद्धतीत बदल करा
गोरेगाव : बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते; परंतु अनुदान देण्याची जाचक अट असल्यामुळे लाभार्थींची आर्थिक कोंडी होते. त्यामुळे लाभार्थी कर्जबाजारी होतो. अनुदान देण्याच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी लाभार्थींनी केली आहे.