कॉलेज रोडवर चालणार बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 21:38 IST2018-03-22T21:38:55+5:302018-03-22T21:38:55+5:30
कुडवा नाका ते नमाद महाविद्यालयासमोरील नाल्यापर्यंतची मोजणी करण्यात आल्यानंतर आता नगर परिषदेने कुडवा नाका येथे होर्डिंग लावून अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची सूचना दिली आहे.

कॉलेज रोडवर चालणार बुलडोजर
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : कुडवा नाका ते नमाद महाविद्यालयासमोरील नाल्यापर्यंतची मोजणी करण्यात आल्यानंतर आता नगर परिषदेने कुडवा नाका येथे होर्डिंग लावून अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची सूचना दिली आहे. येत्या २६ तारखेला येथील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कॉलेज रोडवर बुलडोजर चालणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शहरातील अतिक्रमणाचा विषय गंभीर बनला असून हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी शहरवासी व प्रशासनाचीही इच्छा आहे. यामुळेच मध्यंतरी अतिक्रमणाचा हा विषय चांगलाच गाजला होता. आता अतिक्रमण काढायचेच असा मानस घेऊन नगर परिषद, भूमी अभिलेख व तहसील कार्यालयाकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली होती. तसेच यांतर्गत कुडवा नाका ते नमाद महाविद्यालय रस्त्यावरील अतिक्रमणाची तिन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून भूमी अभिलेख विभागाला मोजणीसाठी सांगण्यात आले होते.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या पाहणीनंतर माशी कोठे शिंकली काही कळलेच नाही. मात्र आता दोन दिवसांपूर्वी अचानकच कुडवा नाका परिसरात नगर परिषदेचे होर्डींग झळकले. या होर्डींगमधून कुडवा नाका ते नमाद महाविद्यालयासमोरील नाल्यापर्यंत ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना ते अतिक्रमण २६ तारखेपर्यंत काढण्याची सूचना देण्यात आली आहे. तर २६ तारखेला कॉलेज रोड म्हणून ओळखल्या जाणाºया या रस्त्यावर बुलडोजर चालणार असल्याचीही माहिती आहे.
त्यामुळे पेंडींग असलेला अतिक्रमणचा विषय आता पुन्हा हाती घेण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले. तसेच मनोहर चौकातील पोलीस क्वार्टरच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले होते.
मात्र तेथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आढळल्याने आता त्या जागेचा पंचनामा व पुन्हा मोजणी करून हे अतिक्रमणही काढले जाणार आहे. त्यामुळे अतिक्रमणाचा हा विषय तिन्ही विभागांकडून हाती घेण्यात आल्याचे दिसत आहे.
मार्किंग अभावी मोहीम अडकून
सध्या शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रमण काढण्याचे नगर परिषद, भूमी अभिलेख व तहसील कार्यालयाकडून ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गांवरील किती अतिक्रमण आहे व किती काढावे लागणार आहे यासाठी मार्किंग करून देण्यास भूमी अभिलेख विभागाकडे सांगण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाकडून या रस्त्यांची मार्कींग करून दिल्यावर लगेच मोहिम राबविली जाणार असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगितले. मात्र मार्किंगचे कामच रेंगाळत असल्यामुळे मोहिमेसाठी मुहूर्त काही मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.