पाणीटंचाईमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत

By Admin | Updated: May 15, 2014 01:28 IST2014-05-15T01:28:14+5:302014-05-15T01:28:14+5:30

तीव्र उन्हाळ्याच्या पूर्वीच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच जलस्त्रोत आटल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत सापडले आहे

Building business difficulties due to water scarcity | पाणीटंचाईमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत

पाणीटंचाईमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत

गोंदिया : तीव्र उन्हाळ्याच्या पूर्वीच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच जलस्त्रोत आटल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे या व्यवसायावर आता मंदीचे सावट पसरले आहे. उपजीविकेसाठी बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कामगारांना मोठय़ा प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी सिमेंट कंपन्यांच्या मनमानीमुळे सिमेंटच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात लोखंड, स्टील आणि सिमेंटच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय कंपन्यांनीही दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा घर व फ्लॅट्सच्या किमतीत वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी पाणी टंचाईमुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम जाणवतोच. परंतु यंदा पाणी टंचाईला महागाईची जोड मिळाल्याने बांधकाम व्यवसायावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
बांधकाम व्यवसायातील या मंदीचा फटका यावरच दैनंदिन जीवन अवलंबून असलेल्या कामगारांवर बसला आहे. अनेक मजुरांना काम मिळणेही कठीण झाले आहे. बांधकाम साहित्यांच्या किमतीती सतत होणार्‍या वाढीमुळे प्लॅट्सच्या किमती १५ ते २0 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
शहरातील चौकाचौकात ठिय्या मांडून बसलेल्या कामगारांची उन्हाळ्याच्या दिवसात कामाअभावी मोठीच थट्टा होत आहे. जेथे प्यायलाच पाणी मिळत नाही, तेथे बांधकामासाठी पाणी कुठून पुरणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात निदान दोन महिने तरी बांधकाम बंदच ठेवावे लागते. त्यातच आता लोखंड महाग झाल्याने बांधकामावर परिणाम झाला आहे. त्यामुळे एक महिन्यापासून दररोज कामगार तासनतास कामाच्या शोधात ठिय्या मांडून असलेले आढळतात. सकाळी ८ वाजता आलेल्या मजुरांना दुपारच्या दोन वाजतापर्यंतसुद्धा काम मिळेणासे झाले आहे. त्यामुळे साफसफाई व हमाली यासारख्या कामांचा या मजुरांनी आधार घेतल्याचे दिसून येत आहे.
बांधकामावर २00 ते २५0 रूपये दिवस मजुरी मिळविणारे हे कामगार आता ५0 व १00 रूपये रोजीवर समाधान मिळवायला तयार आहेत. पाण्याअभावी व इतर कारणांमुळे शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या इमारतींचे बांधकाम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहेत. काही कामगार तर दुपारचे २ वाजले तरी हाती काम न मिळाल्याने रिकाम्या हातानेच परततात. या प्रकाराने मजुरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Building business difficulties due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.