तत्काळ आरक्षणात दलालच ठरताहेत वरचढ
By Admin | Updated: November 11, 2014 22:42 IST2014-11-11T22:42:46+5:302014-11-11T22:42:46+5:30
रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या तत्काळ आरक्षणासाठी इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. तत्काळचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्यांना आरक्षणासाठी केंद्राबाहेर रांग लावावी लागते.

तत्काळ आरक्षणात दलालच ठरताहेत वरचढ
गोंदिया : रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या तत्काळ आरक्षणासाठी इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. तत्काळचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्यांना आरक्षणासाठी केंद्राबाहेर रांग लावावी लागते. १० वाजता केंद्र सुरू झाल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे एवढा आटापिटा करूनही त्यांच्यावर दलाल वरचढ ठरत आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि दलालांमधील हे मधूर संबंध संपुष्टात येऊन सर्वसामान्य ग्राहकांना रेल्वे प्रशासनाने दिलासा देण्याची मागणी होत आहे.
सर्व सुविधा व सुरक्षित असे वाहतुकीचे साधन म्हणजे आज रेल्वे समजले जाते. यामुळेच रेल्वे विभागाच्या सेवेवर विश्वास ठेवून बहुतांश नागरिक रेल्वेने प्रवास करतात. साधारण व आरक्षण अशा दोन वर्गाने रेल्वेने प्रवाश्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. यात आरक्षण सुविधेसाठी रेल्वे स्थानकाच्या रेलटोली परिसरात विशेष आरक्षण केंद्र सुरू आहे. हे आरक्षण केंद्र आजघडीला समस्यांचे केंद्र बनले आहे. येथे प्रवाश्यांपेक्षा दलालांना जास्त सुविधा पुरविल्या जात असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे या केंद्रात तत्काळ श्रेणीतून आरक्षण करविण्यासाठी येणाऱ्यांची चांगलीच पंचाईत होते. आकस्मिक प्रवासाचा योग घडून आल्यास तत्काळ आरक्षण सेवा अत्यंत उपयोगी पडते. या सेवेचा अर्थच त्वरित आरक्षण मिळणे हे आहे. यामुळेच बहुतांश नागरिक आज काही पैसे जास्त मोजून तत्काळ आरक्षण सेवेचा लाभ घेण्यासाठी धजावतात, मात्र यासाठी येथील आरक्षण केंद्रावर केंद्राच्या निरीक्षकांनी विशेष नियम लाऊन ठेवल्याचे बोलले जात आहे.
आरक्षण केंद्रात चार खिडक्या आहेत. यातील दोन खिडक्या सामान्य तर दोन खिडक्या आरक्षण तिकीटांच्या आहेत. सामान्य तिकीटांसाठी असलेल्या दोन खिडक्यांतील एक खिडकी पहाटे ४ वाजता तर दुसरी खिडकी सकाळी ७ वाजता उघडते. तसेच आरक्षण तिकीटांसाठी असलेल्या दोन खिडक्यांतील खिडक्या सकाळी आठ वाजता उघडतात. या खिडक्यांमधूनच सकाळी १० वाजतापासून तत्काल आरक्षणाची सुविधा सुरू होते. मात्र त्यासाठी भल्या पहाटेपासूनच नागरिकांची लांबलचक रांग लागते. खास बात म्हणजे, ही रांग आरक्षण केंद्राच्या चॅनल गेटच्या बाहेर लावावी लागते व तसे केंद्राचे निरीक्षक एल.सी.साहू यांचे आदेश असल्याचे सांगण्यात येते.शिवाय सकाळी १० वाजता तत्काळ आरक्षणाची खिडकी सुरू होत नाही तोपर्यंत तत्काळ तिकीटसाठी आलेल्यांना आत प्रवेश दिला जात नाही. त्यांना बाहेरच रांगेत तासनतास ताटकळत उभे रहावे लागते असे प्रवाश्यांनी सांगितले. अशात कुणाला पाण्याची किंवा बसण्याची सुविधाही तेथे नाही. जर कुणी रांगेतून बाहेर पडलाच तर त्याला आपली जागा चुकवावी लागते व यातूनच येथे दररोज भांडणे होतात.
एकंदर तत्काळ आरक्षणासाठी रांगेत लागणाऱ्यांनाच येथे तत्काळ सुविधा पुरवून येथील दलालराज बंद करावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)