एलईडीच्या प्रकाशात शहर चकाकणार

By Admin | Updated: July 29, 2016 01:44 IST2016-07-29T01:44:27+5:302016-07-29T01:44:27+5:30

पथदिवे बंद असल्याने शहरवासीयांना रात्रीला काळोखात वावरण्याचे दिवस आता सरणार आहेत.

The brightness of the LED lights the city | एलईडीच्या प्रकाशात शहर चकाकणार

एलईडीच्या प्रकाशात शहर चकाकणार

तीन कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी
कपिल केकत गोंदिया
पथदिवे बंद असल्याने शहरवासीयांना रात्रीला काळोखात वावरण्याचे दिवस आता सरणार आहेत. कारण नगर परिषद आता शहरातील पथदिव्यांचे साधारण लाईट्स बदलून एलईडी लाईट्स लावणार आहेत. यासाठी तीन कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून असे झाल्यास शहर एलईडीच्या प्रकाशाने चकाकणार आहे.
आजघडीला शहरातील पथदिव्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी नगर परिषदेला ३६ लाख रूपयांचे कंत्राट द्यावे लागत आहे. शिवाय शहरातील सुमारे सहा हजार पथदिव्यांसाठी नगर परिषदेला दरमहा सात लाख रूपये वीज बील भरावे लागत आहे. असे असतानाही पथदिवे बंद राहणे, नादुरूस्त होणे अशा प्रकारच्या समस्या सतत कायम राहत असून शहरवासीयांना समस्येचा सामना करावा लागतो.
रात्रीला पथदिवे बंद पडल्याने शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत असतानाच शहरवासी नगर परिषदेच्या नावाने बोटं मोडतात. सध्या पथदिव्यांची देखभाल व दुरूस्ती करणाऱ्या कंत्राटदाराचे बील अडकल्याने त्यांनी काम बंद पाडण्या इतपत बाब गेली होती. परिणामी शहरातील कित्येक भागातील पथदिवे बंद पडून आहेत. यामुळे मात्र त्या भागांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराला कायम संपुष्टात आणून शहरवासीयांना समस्यामुक्त सेवा देण्याच्या उद्देशातून नगर परिषदेने एलईडी पथदिव्यांचा प्रयोग हाती घेतला आहे.
नगरोत्थान, दलितोत्तर व वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत तीन कोटींच्या निधीतून ही योजना साकारली जाणार असून त्याला मंजूरी मिळाली आहे. आता लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया केली जाणार असून येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी दिली.

जनरल फंडवरील बोजा कमी होणार
आजघडीला नगर परिषदेला पथदिव्यांच्या बिलापोटी दरमहा सात लाख रूपये म्हणजेच ८४ लाख रूपये वर्षाला. तसेच देखभाल व दुरूस्तीसाठी तीन लाख रूपये दरमहा म्हणजेच ३६ लाख रूपये वर्षाला खर्च करावे लागत आहेत. म्हणजेच दरवर्षी एक कोटी २० लाख रूपयांचा खर्च जनरल फंडमधून (नगर परिषदेच्या तिजोरीतून) करावा लागतो. मात्र एलईडी पथदिवे लागल्यास बीलाचा खर्च सुमारे ५० टक्के म्हणजेच ४२ लाख रूपयांवर येणार. शिवाय एलईडी लाईट्स पुरविणाऱ्या कंपनीकडून पाच वर्षांची गॅरंटी मिळणार आहे. त्यामुळे दुरूस्तीसाठी खर्च करावा लागणार नाही. परिणामी देखभाल व दुरूस्तीसाठी लागणारा ३६ लाख रूपयांचा खर्चही कमी होणार आहे. अशात नगर परिषदेच्या तिजोरीतून तेवढा खर्च कमी होणार.

 

Web Title: The brightness of the LED lights the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.