कोंड्याच्या दरवाढीमुळे वीट उद्योग संकटात
By Admin | Updated: May 13, 2015 01:35 IST2015-05-13T01:35:47+5:302015-05-13T01:35:47+5:30
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

कोंड्याच्या दरवाढीमुळे वीट उद्योग संकटात
गोंदिया : शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत कोंड्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तर विटांना मागणीही कमी असल्याने वीट व्यवसाय तोट्यात आहे. परिणामत: व्यावसायिकांनी वीट उद्योग एक महिना अगोदरच बंद केल्याने मजुरांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
वीट व्यवसायाला डिसेंबर महिन्यापासून सुरुवात होते. जवळपास सहा महिने हा व्यवसाय तेजीत सुरू असतो. या व्यवसायाला उन्हाळ्यामध्ये सुगीचे दिवस असतात. मात्र यावर्षी अपुऱ्या पावसामुळे धानाचे उत्पादन कमी झाल्याने वीट व्यवसायिकांवर संक्रात आली आहे. वीट भाजण्यासाठी कोंड्याची आवश्यकता आहे. मात्र उत्पादन कमी व तांदळाची निर्यात बंदी असल्याने राईस मिल मधून कोंड्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात राईस मिल मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने धान उत्पादनावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे याचा परिणाम कोंड्यावर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात धानाची मिलिंग केली जात नसल्यामुळे कोंडा मिलमध्ये तयार होत नाही. त्यामुळे सुरुवातीला २३ हजार रुपये टन मिळणारा कोंडा आता ३१ हजार रुपये टन प्रमाणे विकला जात आहे.
कोंड्याचा उपयोग मोठ्या कंपन्यामध्ये होऊ लागला आहे. कोंड्यामुळे वीज तयार होत असल्यामुळे कोंड्याची मागणी वाढली आहे. काही वर्षापूर्वी ज्या कोंड्याला किंमत नव्हती, त्याच कोंड्याला आता राईस मिल व्यवसायिक संरक्षण देत आहेत. ग्रामीण भागात अनेक बांधकाम होत असल्याने विटांची मागणी आहे. मात्र कोंडाच उपलब्ध नाही तर विटा भाजायच्या कशा, हा प्रश्न वीट व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)