लाचखोर पशुधन विकास अधिकारी अडकला; चालकाच्या माध्यमातून स्वीकारली लाच

By कपिल केकत | Published: March 19, 2024 07:45 PM2024-03-19T19:45:47+5:302024-03-19T19:45:59+5:30

धनादेश काढून देण्यासाठी लाचेची मागणी : चालकाच्या माध्यमातून स्वीकारली लाच

Bribe Livestock Development Officer Trapped; Accepted bribe through driver | लाचखोर पशुधन विकास अधिकारी अडकला; चालकाच्या माध्यमातून स्वीकारली लाच

लाचखोर पशुधन विकास अधिकारी अडकला; चालकाच्या माध्यमातून स्वीकारली लाच

गोंदिया : शेळीगटाच्या अनुदानाचा धनादेश काढून देण्यासाठी चालकाच्या माध्यमातून चार हजार रुपयांची लाच स्वीकारणारा पशुधन विकास अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. सालेकसा येथील पशुवैद्यकीय कार्यालयात सोमवारी (दि. १८) ही कारवाई करण्यात आली. पशुधन विकास अधिकारी सरोजकुमार ग्यानीराम बावनकर (५६, रा. टी. बी. टोली, गोंदिया) व कंत्राटी चालक भूमेश्वर जवाहरलाल चौहाण (३३, रा. गोरे-सालेकसा), अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदारांची (४८, रा. गोरे-सालेकसा) मराठवाडा पॅकेज अंतर्गत शेळीगट अनुदान वाटपमध्ये निवड झाली असून, त्यांनी खरेदी केलेल्या शेळ्यांच्या अनुदानाचा ५७,३५० रुपयांचा पहिला हप्ता यापूर्वी मिळाला आहे. अनुदानाचा ५७,३५० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याचा धनादेश काढून देण्याकरिता आरोपी पशुधन विकास अधिकारी सरोजकुमार बावनकर याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता सरोजकुमार बावनकर याने तडजोडीअंती चार हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम फिरते पशुवैद्यकीय दवाखान्याचा कंत्राटी चालक भूमेश्वर चौहाण याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार, पथकाने सोमवारी (दि. १८) सालेकसा येथील पशुवैद्यकीय कार्यालयात सापळा लावला असता भूमेश्वर चौहाण याने पंचांसमक्ष चार हजार रुपयांची लाच स्वीकारली. पथकाने सरोजकुमार बावनकर व भूमेश्वर चौहाण या दोघांना अटक केली असून, त्यांच्यावर सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास काळे, पोलिस निरीक्षक उमाकांत उगले, अतुल तवाडे, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलिस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाणे, महिला शिपाई संगीता पटले, चालक दीपक बाटबर्वे यांनी पार पाडली.

Web Title: Bribe Livestock Development Officer Trapped; Accepted bribe through driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.