पोहा मिलच्या धुराने गुदमरतोय श्वास
By Admin | Updated: January 7, 2015 22:55 IST2015-01-07T22:55:43+5:302015-01-07T22:55:43+5:30
येथील प्रधान मोहल्यात मागील २० वर्षापासून सुरु असलेल्या पोहा मिलच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदुषणामुळे परिसरातील

पोहा मिलच्या धुराने गुदमरतोय श्वास
नवेगावबांध : येथील प्रधान मोहल्यात मागील २० वर्षापासून सुरु असलेल्या पोहा मिलच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदुषणामुळे परिसरातील अनेकांना फुफ्फुसाचे आजार होत असल्याची चर्चा देखील गावात सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे की, मागील सुमारे २० वर्षापासून नवेगावबांध येथील प्रधान मोहल्यात पोहा मिल सुरु आहे. मिलमधून निघणारा धूर आणि राखेची धुळ याचे आजतागायत योग्य व्यवस्थापन करण्यात आलेले नाही. शासनाचे निकषानुसार औद्योगीक व्यवसायीक भट्टींना चिमणी लावणे अनिवार्य आहे. त्या चिमणांची उंची ४६ फुट असावी असेही ऐकिवात आहे. त्यामध्ये ‘मेकॅनिकल डस्ट कलेक्टर’ लावणे देखील अनिवार्य आहे. परंतु शासनाच्या निकषांची अजुनही पुर्तता करण्यात आली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली होती, परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत देखील मुकदर्शकाची भूमिका बजावत असल्याचा आरोप होत आहे.
मिलच्या परिसरात बहुसंख्य मजूरवर्ग राहत असल्याकारणाने त्यांचा आवाज दाबण्याचा सतत प्रयत्न केला जातो. हेतुपरस्पर कारवाई टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे आतातरी या पोहामीलच्या प्रदुषणाचे शासकीय नियमानूसार व्यवस्थापन करण्याचे निर्देश देण्यात यावे किंवा सदर मिल गावाबाहेर काढावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जिल्ह्यात प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय नाही. गेल्या १४ वर्षांपासून या कार्यालयाचा कारभार भंडारा येथूनच सुरू आहे. आता पालकमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेऊन हे कार्यालय गोंदियात आणल्यास अनेक समस्या दूर होतील. (वार्ताहर)