Breaking point in ZP's alliance | झेडपीतील युतीला ब्रेकअपचे वेध
झेडपीतील युतीला ब्रेकअपचे वेध

ठळक मुद्देसंडे अँकर । वर्ष शिल्लक असताना हालचाली । जि.प.मध्ये पुन्हा सत्ताबदल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील जिल्हा परिषदेत मागील चार वर्षांपासून काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना सुद्धा केवळ विरोधाला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने जि.प.मध्ये सत्ता स्थापन करणे शक्य असताना कमळ हातात घेवून जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यात आली. याला आता चार वर्षांच्या कालावधी पूर्ण होत असताना ही युती तोडण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच झेडपीतील युतीचा ब्रेकअप होण्याची शक्यता आहे.
महराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर यावर मंथन करण्यासाठी प्रदेशस्तरावर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून मुंबई येथे आढावा घेतला जात आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्टÑ प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे,माणिकराव ठाकरे, विजय वड्डेटीवार, सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.
या बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर फोडले. मात्र यावर काँग्रेसच्या नेत्यांनी कटरे यांनाच खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. यानंतर कटरे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपसोबत असलेल्या युतीमुळे काँग्रेसचे नुकसान झाल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.
२३ जूनला आसोली जि.प.क्षेत्रासाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत भाजपसोबत असलेली युती तोडण्याचे आश्वासन काँग्रेसच्या बैठकीला उपस्थितीत वरिष्ठ नेत्यांना दिले. त्यामुळे आता चार वर्षांनंतर जि.प.मधील काँग्रेस आणि भाजपची युती तुटणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे २०१८ मध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गोंदिया वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सर्व मतदारसंघात आघाडीवर होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचा उमेदवार सर्वच मतदार संघात पिछाडीवर आहे. तर गोंदिया मतदारसंघात तर ३८ हजार मतांचे मताधिक्य भाजपच्या उमेदवाराला मिळाले.
यावर सुध्दा बैठकीत बरेच मंथन झाल्याची माहिती आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्ष कटरे यांनी पोटनिवडणुकीनंतर गोंदिया जि.प.मध्ये भाजपसोबत असलेली युती तोडण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना दिल्याची माहिती या बैठकीला उपस्थित जिल्ह्यातील एका पदाधिकाºयाने दिली. दरम्यान या बैठकीतील चर्चेची माहिती जिल्ह्यात पसरताच जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. विशेष म्हणजे गोंदिया जि.प.च्या एकूण पक्षीय बलाबलावर नजर टाकल्यास काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपचे १७ सदस्य आहे.सत्ता स्थापन करण्यासाठी २६ या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समविचारी पक्ष एकत्रित येऊन जि.प.मध्ये सहज स्थापन करु शकले असते. मात्र तसे न करता जि.प.निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाºया राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जि.प.मध्ये भाजपसोबत युती करुन सत्ता स्थापन केली.
या निर्णयाला पक्षांतून सुध्दा काही प्रमाणात विरोध झाला होता. मात्र अध्यक्ष आणि सभापतीपद मिळत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर आता जि.प.चा वर्षभराचा कार्यकाळ शिल्लक असताना ही युती तोडण्याचा निर्णय घेतला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी याबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा ठरवू असे लोकमतशी बोलतांना सांगितले.


Web Title: Breaking point in ZP's alliance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.