डोस संपल्याने लसीकरणाला पुन्हा ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:40+5:302021-07-07T04:35:40+5:30
गोंदिया : शासनाकडून एकीकडे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यास सांगितले जात असतानाच दुसरीकडे लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरण ...

डोस संपल्याने लसीकरणाला पुन्हा ब्रेक
गोंदिया : शासनाकडून एकीकडे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यास सांगितले जात असतानाच दुसरीकडे लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका बसत आहे. जिल्ह्यात लसींचा साठा संपल्याने व सोमवारीही लस न मिळाल्याने आता मंगळवारी पुन्हा लसीकरणाला ब्रेक लावावा लागणार आहे.
लसीकरणासाठी आतापर्यंत प्रशासनाकडून धावपळ केली जात होती. मात्र, आता लस घेण्यासाठी नागरिक सरसावत असतानाच लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात लसीकरणाला वारंवार ब्रेक लावावा लागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून अशीच स्थिती दिसून येत आहे. लसींचा साठा संपल्याने गुरुवारी व शुक्रवारी मोजक्या प्रमाणात लसीकरण झाले. मात्र, शुक्रवारी (दि.२) जिल्ह्याकरिता २६६०० डोससचा पुरवठा झाला असता शनिवारी तब्बल २१४०८ नागरिकांनी लस लावून घेतली. परिणामी, उरलेल्या ५१९२ लसींचा सोमवारी वापर झाला असावा, अशी स्थिती आहे. म्हणजेच, आता पुन्हा एकदा डोस संपले असून लसींचा पुरवठा न झाल्याने मंगळवारी (दि.६) लसीकरणाला ब्रेक लावावा लागणार आहे.
---------------------
अद्याप काहीच मॅसेज नाही
जिल्ह्याला लसींचा पुरवठा केला जात असताना तसा मॅसेज येतो. त्यानुसार, येथून गाडी पाठविली जाते व नागपूरवरून लसींचा साठा आणला जातो. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत तरी असा कुठलाच मॅसेज मिळालेला नव्हता. म्हणजेच, मंगळवारी लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे आता मंगळवारी लस मिळाल्यास बुधवारी लसीकरण होणार काय हे मंगळवारीच कळेल.