देशीकट्टा प्रकरणातील दोघांची जामिनावर सुटका ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:10+5:302021-03-31T04:29:10+5:30
गोंदिया : गोंदिया शहरात देशीकट्ट्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचा सूर उमटताच पोलीस अधीक्षकांनी ...

देशीकट्टा प्रकरणातील दोघांची जामिनावर सुटका ()
गोंदिया : गोंदिया शहरात देशीकट्ट्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचा सूर उमटताच पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेत देशीकट्टा विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्ट्यासह दोघांना रविवारी (दि.२८) अटक केली होती. मात्र त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात फरार आरोपीचा शोध पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंदे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करीत आपल्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी रवाना केले. यातच रविवारी (दि.२८) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार भूवनलाल देशमुख, अर्जुन कावळे, पोलीस नायक कोडापे, विनोद गौतम शहर ठाण्याच्या हद्दीत होळी बंदोबस्त, गुन्हेगार शोध व पेट्रोलिंग करीत असता त्यांना मपूर ऊर्फ आऊ उमेश उपाध्याय (१९,रा. मुर्री-लालपहाडी) हा विनापरवाना पिस्टल बाळगून लालपहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने उभा आहे अशी माहिती होती. यावर पथकाने सापळा रचून मपूर उपाध्याय याला ताब्यात घेतले होते. पिस्टलसंदर्भात त्याला विचारणा केली असता त्याने मयूर प्रेमलाल गजभिये (रा.कुंभारेनगर) यास दिल्याचे व पिस्टल धम्मदिप गजभिये (रा. कुंभारेनगर) याच्या मालकीची असल्याचे सांगितले. यावरून त्याला ताब्यात घेऊन पथक बाजपेयी चौक येथे जात असताना रस्त्याने जाणारा मयूर गजभिये दिसल्याने त्याला पकडून तपासणी केल्यावर त्याच्या कंबरेला पॅन्टमध्ये मागच्या बाजूला देशीकट्टा आढळला होता. देशीकट्टा ३५ हजार रुपये किमतीचा आहे. या प्रकरणात मयूूर गजभिये व मपूर उपाध्याय यांना अटक करण्यात आली होती. या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर फरार आरोपी धम्मदीप गजभिये याचा शहर पोलीस शोध घेत आहेत.