उद्ध्वस्त संसारातील चिमण्यांना मायेची ऊब

By Admin | Updated: May 10, 2015 00:03 IST2015-05-10T00:03:47+5:302015-05-10T00:03:47+5:30

स्वयंपाक करताना उडालेल्या स्टोव्हच्या भडक्यात मृत्यू पावलेल्या मातेची दोन लेकर अनाथ झाली.

Bored of mysterious sparrows | उद्ध्वस्त संसारातील चिमण्यांना मायेची ऊब

उद्ध्वस्त संसारातील चिमण्यांना मायेची ऊब

छाया माऊलीची : लेकरांना अधिकारी बनविण्याचे रंगविते स्वप्न
नरेश रहिले गोंदिया
स्वयंपाक करताना उडालेल्या स्टोव्हच्या भडक्यात मृत्यू पावलेल्या मातेची दोन लेकर अनाथ झाली. त्या लेकरांना मायेची ममता कोण देईल या विवंचनेत सर्व नातेवाईक व घरातील मंडळी चिंताग्रस्त होती. याच घटनेत विधवा झालेल्या काकूने त्या लेकरांना मायेची ममता देत त्यांचा सांभाळ केला. घटनेनंतर पोटातील गोळ्याला व जाऊच्या मुलांना मायेचा ओलावा देणारी ती समाजासाठी आदर्श माता ठरली.
गोंदिया शहरात राहणाऱ्या भेलावे कुटुंबातील सविता भेलावे ह्या २२ जून २०१० ला स्टोव्हचा भडका उडाल्याने गंभीररित्या भाजल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे दीर कुशलेंद्र भेलावे हे गेले असताना दोघेही गंभीररीत्या भाजले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. यावेळी सविताला एक मुलगा एक मुलगी असे दोन अपत्य होते. कुशलेंद्रची पत्नी सुनीता यावेळी गर्भवती होती. पोटात तीन महिन्याचा गर्भ असताना तिच्यावर ओढावलेले संकट पाहून प्रत्येकाच्या तोंडातून ‘अरे रे बिच्चारी’ अठराव्या वर्षी विधवा झाली हेच शब्द प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडायचे. भावजय व दिराचा या घटनेत मृत्यू झाल्याने भासरे व सून दोघेही किंकर्तव्यमूढ झाले. त्या दोघांना त्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा मांडायचा होता. वेळ कुणासाठी थांबत नाही. आयुष्य तर जगायच आहे. या जगण्यालाच तडजोड असे म्हटले जाते. दोघांच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन समझोता केला. सविताच्या दोन मुलांना मायेचे पांघरून व सुनिताच्या गर्भातील बालकाला पित्याचे छत्र मिळावे म्हणून संतोष भेलावे व सुनीता यांचे शुभमंगल घडवून आणण्याचा निश्चय केला. उपस्थितांच्या साक्षीने २२ एप्रिल २०११ ला त्यांचा शुभमंगल झाले. त्या दिवसापासून सविताने जन्म दिलेल्या अंजली व प्रथमेश यांचा सांभाळ करून तिने आपल्या मातृत्वाचा उदार परिचय दिला. त्यांना उत्तम शिक्षण द्यावे, अधिकारी बनवावेत म्हणून सुनीता त्यांच्यासाठी दिवसरात्र खपत आहे. गोंदियाच्या नामवंत शाळेत त्यांचे नाव टाकून स्वत: त्यांना मार्गदर्शन करीत आहे. गर्भात असलेल्या बाळाला बापाचे नाव देण्यासाठी संतोषनेही पुढाकार घेतला. त्या बाळाला बापाचे नाव मिळाले. अन् सविताच्या मुलांना सुनीताच्या रूपाने हक्काची आई मिळाली. सुनीता यांना संतोषपासून एक अपत्य आहे. आता संतोष व सुनीता दोघेही चार मुलांचा सांभाळ गुण्यागोविंदाने करीत आहेत.

तिच्या कर्तृत्वाला सलाम
कणिक तिबून भरलेले हात असताना माझा फोन खणखणला. आताच्या आता केटीएस मध्ये जा. ऐन मे महिना, ऊन्ह मी म्हणत होती. झाडाशी सावली त्या उन्हाला थोपविण्याचा केविलवाना प्रयत्न करीत होती. काही अंतरावर आईच्या कुशीत निवांत पडलेली गोंडस छकूली माझेकडे पाहून हसत होती. नंतर कळल की त्याच छकुलीच्या आईच आणि तिचं डिएनए टेस्टसाठी प्रकरण आले आहे. घामाच्या धारात आणि पोलिसांच्या गराड्यात ती मी नव्हेच म्हणणारा तो आला. डीएनए झाले पण तब्बल दोन वर्षांने रिपोर्ट आली. छकुलीचा पिता तो मी नव्हेच म्हणणारा राजेश गंगाराम रहांगडालेच आहे हे सिद्ध झाले. कायद्याच्या पळवाटाचा वापर करुन त्याने दुसरा विवाह केला तिने मात्र बापाला मुलीचे नाव मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत यशस्वी झुंज दिली. कायद्याने तिला पहिली पत्नी म्हणून मान्यता दिली आणि मुलीला वडिलाचे नाव मिळाले. पण त्या संघर्षाची कहानी डोळ्याच्या कडा ओलावणारी आहे. या संघर्षाचे नाव आहे झामेश्वरी राजेश रहांगडाले. राजेश रहांगडाले ने पुनर्विवाह करुन वेगळा संसार थाटला. ही मात्र संसार सुखाला पारखी झालेली. ठेचाळते, ठोकरते परत उठते ‘भगवान के घर मे देर है अंधेर नही’ म्हणत बापाने नाकारले, ठोकरले अन् आईने सावरले. आज त्या मुलीची आई आणि बाप तीच आहे. तिला गोंदियातील समाजसेविका सविता बेदरकर यांच्या मदतीने, तिच्यात भरलेल्या आत्मविश्वासामुळे झामेश्वरी आजही लढत आहे.

कधी संपणार माते तुझा वनवास गं...
समाजात वावरतांना अचानक झालेल्या भेटीतून जवळीक निर्माण झाली. त्या जवळीकतून प्रेमाला सुरूवात झाली. प्रेमाचे लग्नात रूपांतर झाले. काळ बदलत गेला व जीवनातील नविन समीकरण पुढे येत गेले. ज्याने प्रेमाच्या भूलथापा देत चक्क लग्न केले त्याच नवऱ्याने गर्भात असलेल्या मुलीला माझी मुलगी नाही म्हणून अशी ओरड केली. नंतर त्या मुलीला माझी मुलगी आहे, अशी कबुली त्याने न्यायालयात दिली.
अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या जांभळी पोरला येथील रहिवासी सुकन्या (काल्पनिक नाव) ही तरूणी आमगाव तालुक्यात परिचारीका म्हणून कार्यरत होती. ती दहेगाव येथे राहात असतांना त्यांना ठाणा येथील बँकेतून व्यवहार करावा लागत होता. त्या बँकेत कर्ज घेण्यासाठी गेल्या असतांना त्यांच्या समाजातील एक व्यक्ती व्यवस्थापक असल्याने त्याच्याशी जवळील निर्माण झाली. त्याने त्यांना २५ हजाराचे कर्ज दिले. त्यानंतर दिलेल्या कर्जातून कोणकोणते साहित्य घेतले याची पाहणी करण्याच्या नावावर आलेल्या व्यवस्थापकाने त्यांना आपण जातीचे आहोत असे सांगून त्यांना प्रेमाची भूरळ घातली. यात त्या दोघांत प्रेमसंबध निर्माण झाले. सन २००० ला त्यांनी आळंदी येथील विठ्ठल रूक्मीणी मंदिरात जाऊन विवाह केला. लग्नाच्या वर्षभरानंतर त्याचे पूर्वीच लग्न झाले होते अशी माहिती सुकन्याला मिळाली. तरीही ते दहेगावला एकत्र राहू लागले. तो व्यवस्थापक आमगावला येथे काही काळ वास्तव्यास होता. अधून मधून सुकन्या भेटण्यासाठी यायचा. या संबधातून सुकन्याला गर्भधारणा झाली. त्याने तिचा पहिला गर्भपात करायला प्रवृत्त केले. त्यानंतर सुकन्याची बदली मोहाडी येथे झाली. तेथेही दोघांचे राहणे सुरूच असल्यामुळे पुन्हा ती गर्भवती राहीली. दुसराही गर्भ काढ असे तो म्हणायचा. परंतु सुकन्याने नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. वाद झाल्यानंतर तो निघून गेला. प्रसूतीची वेळ आल्यावर सुकन्याला ब्रम्हपूरी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याने घरमालकाच्या हाताने प्रसूतीसाठी पैसेही पाठविले. मुलीच्या बारश्याला छापलेल्या पत्रिकेत त्याचे नाव होते. तेव्हा त्याने गुण्या गोविंदात कार्यक्रम साजरा केला.
परंतु मुलगी वर्षभराची झाल्यानंतर तिच्या वाढदिवसाचा पत्रिका छापताच ती माझी मुलगी नाही, ती माझी पत्नी नाही म्हणून कांगावा करून त्याने सुकन्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. सुरूवातीला प्रकरण न्यायालयात टाकताना माझी मुलगी नाही म्हणणाऱ्या त्या बँकेच्या व्यवस्थापकाने आता श्रेयाला आपली मुलगी असल्याचे कबूल केले. परंतु पत्नी म्हणून सुकन्याला तो स्वीकारण्यास तयार नाही. सुरूवातीला त्याने मी नपुसक आहे अशी खोटी सर्टीफीकेट न्यायालयात सादर केली व न्यायालयाची दिशाभूल केली. मागील ११ वर्षापासून सुकन्या न्याय मिळविण्यासाठी धडपडत आहे. आजही श्रेया वडीलाच्या प्रेमापासून वंचीत आहे.

मुलांना बाळकडू पाजा
जन्म दिल्यावर त्या बाळांवर योग्य संस्कार करण्याचे काम मातेचे आहे. जिजामातेने बाळकडू पाजला नसता तर छत्रपती गाजले नसते. जिजा मातेच्या संस्कारामुळे शिवराय लढवय्ये झाले. लहानपणापासून बालकांवर संस्काराचे चांगले बीज रोवले तर आयुष्यभर ते आईवडीलांकडे पाठ फिरविणार नाहीत. आपणच कर्तव्यापासून मुकलो आणि संस्कार देण्यात कुचराई झाली तर त्याचे फळ आपल्यालाच मिळते अशी प्रतिक्रिया झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खुणे यांनी दिली.

Web Title: Bored of mysterious sparrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.