सिमेंट बंधारा ठरला शेतकऱ्यांसाठी वरदान
By Admin | Updated: September 26, 2015 01:50 IST2015-09-26T01:50:27+5:302015-09-26T01:50:27+5:30
तालुक्यातील शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. जलसिंचनाच्या सोयीअभावी अनेकदा एका पावसासाठी धान पिकाच्या उत्पादनापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते.

सिमेंट बंधारा ठरला शेतकऱ्यांसाठी वरदान
लहरी निसर्गावर उपाय : कृषी अधिकारी कार्यालयाची फलश्रुती
बोंडगावदेवी : तालुक्यातील शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. जलसिंचनाच्या सोयीअभावी अनेकदा एका पावसासाठी धान पिकाच्या उत्पादनापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते. शेतकऱ्यांवर येणारे नैसर्गिक संकट टळावे म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत दाभणा येथे बांधण्यात आलेला सिमेंट नाला बंधारा आजच्या स्थितीत परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्या वतीने गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत दाभना (अरतोंडी) येथे गट क्र.१/५ मध्ये सिमेंट नाला बंधाऱ्याचे बांधकाम जुलै २००५ अखेर पूर्ण करण्यात आले. सदर बंधारा १६ मिटर लांबीचा असून १०५३ टीसीएम पाणी साठ्याची क्षमता आहे. दाभना येथील या सिमेंट नाला बंधाऱ्यात भरपूर पाणी अडून असून बांधावरुन पाणी वाहू लागले आहे.
या पाण्यामुळे १ कि.मी. अंतरापर्यंत पाण्याचा प्रवाह वाहात आहे. पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही काठावरील शेतकऱ्यांनी ५० हेक्टर क्षेत्रासाठी भाताची नर्सरी भरण्याचे काम पूर्ण केले होते. नर्सरी लावल्यानंतर लगेच पावसाचा खंड पडला. धानाची नर्सरी जगविण्यासाठी बांधाजवळील शेतकऱ्यांनी विद्युत पंप व डिझेल पंपद्वारे बंधाऱ्यातील पाठ्याचा उपसा करुन भाताच्या नर्सरीला संजिवनी देण्यात आली. पावसाचे आगमन झाल्यानंतर बंधाऱ्यावरुन पाणी धो-धो वाहू लागले. बंधाऱ्यातील पाण्यामुळे बांध काठावरील पिंपळगाव, दाभना येथील शेतकऱ्यांनी त्याचा योग्य वापर केला. त्यामुळे त्यांचे धानाचे पीक समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने बांधलेला सिमेंट नाला बंधारा शेतकऱ्यांना वरदान ठरत असल्याचे सरपंच गणपत प्रधान, विजय शिवणकर, यशवंत तरोणे, नामदेव तरोणे, ज्ञानेश्वर तरोणे, निवृत्ती तरोणे, सत्याजीराव तरोणे, लिलाधर पाथोडे आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी रुषी चांदेवार, कृषी पर्यवेक्षक एम.बी. ठाकूर, कृषी सहायक अविनाश हुकरे यांनी शर्तीचे प्रयत्न करुन बंधाऱ्याचे काम जलदगतीने पूर्ण केले. (वार्ताहर)