ग्रंथांमुळे मिळते माणसाच्या आयुष्याला वळण

By Admin | Updated: January 30, 2016 02:11 IST2016-01-30T02:11:47+5:302016-01-30T02:11:47+5:30

कोणत्याही क्षेत्राबद्दल मिळणारे ज्ञान हे मानवाकडूनच मिळते. मानव जातीने केलेली प्रगती ही ग्रंथांच्या माध्यमातून उपलब्ध होते.

The book turns the man's life into turn | ग्रंथांमुळे मिळते माणसाच्या आयुष्याला वळण

ग्रंथांमुळे मिळते माणसाच्या आयुष्याला वळण

उपवनसंरक्षक रामगावकर : ‘ग्रंथोत्सव २०१५’ चे थाटात उद्घाटन
गोंदिया : कोणत्याही क्षेत्राबद्दल मिळणारे ज्ञान हे मानवाकडूनच मिळते. मानव जातीने केलेली प्रगती ही ग्रंथांच्या माध्यमातून उपलब्ध होते. ग्रंथातील माहितीमुळेच माणसाच्या आयुष्याला वळण मिळते एवढी शक्ती ग्रंथात आहे, असे विचार उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केले.
श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ, जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सव-२०१५ चे उद्घाटक म्हणून डॉ.रामगावकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी एस.एस.गर्ल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.के.बहेकार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शारदा वाचनालयाचे सदस्य विजय बैस, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. श्रावण उके, सदस्य वाय.डी.चौरागडे, चित्रा ढोमणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज.सू.पाटील व खुमेंद्र बोपचे यांची उपस्थिती होती.
डॉ.रामगावकर म्हणाले, मानवी जीवनात ग्रंथाला अनन्यसाधारण महत्व आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. बहेकार म्हणाले, ग्रंथ हे जन्मापासून तर मरणापर्यंत साथ देणारे आहेत. आजच्या तांत्रिक युगात ग्रंथाचे महत्व अबाधित आहे. यशाचा मार्ग हा ग्रंथातून शोधता येतो. धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक ग्रंथांमुळे यशस्वी जीवन जगता येते. नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे विचार परिवर्तन करण्याचे काम ग्रंथ करीत असून सकारात्मक जीवन जगण्यास ग्रंथांची भूमिका महत्वाची आहे.
जिल्हा माहिती अधिकारी खडसे म्हणाले, वाचन संस्कृती टिकून राहावी यासाठी ग्रंथोत्सव महत्वपूर्ण आहे. वाचनाची आवड निर्माण झालेली व्यक्ती विविध क्षेत्रात यशस्वी होते. शिक्षण घेत असताना मुलामुलींनी नोकरी लागावी यासाठी स्पर्धा परीक्षांची व अन्य सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक पुस्तकेही वाचावीत. वाचन संस्कृतीमुळे वैचारीकदृष्टया सुदृढ समाज निर्मित होण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले.
एम.बी.पटेल महाविद्यालय देवरी येथील प्रा.डॉ.वर्षा गंगणे यांनी लिहीलेल्या ‘आदिवासी स्त्रियांच्या आर्थिक व सामाजिक समस्या’ या विषयावरील पुस्तकाचे व गोरेगाव येथील उग्रसेन मेश्राम, विकास चाचेरे व यशवंतसिंह पवार यांनी लिहिलेल्या माध्यमिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पूर्वतयारी भाग-२ चे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्र माला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांची व जिल्हयातील विविध सार्वजनिक वाचनालयांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले. संचालन विनायक अंजनकर यांनी तर उपस्थितांचे आभार सुरेश गिरीपूंजे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)

ग्रंथालयाच्या मदतीने नोकरीची
वाट धरणाऱ्या युवक-युवतींचा सत्कार
यावेळी जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील पुस्तकांचा लाभ घेऊन शासकीय सेवेत लागलेल्या नामेश्वरी गौतम, बालकेश्वरी पटले, प्रफुल्ल नवरे, अनूज बन्सोड, आशिष कारंडे, अतूल डोंगरे, नवीन चव्हाण, दिलखुश बन्सोड, विजय बोरकर, बादल जांभूळकर, सविता डोंगरे, सविता चवरे, पायल दादुरे, मयुर भांडारकर, मनोज साखरवाडे, रोहित कराडे, कमलेश बडोले, प्रदीप फेंडर यांचा गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ग्रंथदिंडीने केली
वातावरण निर्मिती
या गं्रथोत्सवाच्या निमित्ताने शहरातून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. शारदा वाचनालय येथून उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे व ज.सू.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. ही दिंडी महात्मा गांधी पुतळा, जयस्तंभ चौक, पंडीत जवाहरलाल नेहरु पुतळा, गोरेलाल चौक या मार्गाने फिरून शारदा वाचनालय येथे पोहोचली. ग्रंथदिंडीतील पालखीत भारतीय संविधान, ज्ञानेश्वरी व ग्रामगीता हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. वाचाल तर वाचाल, ज्ञानाची गंगा घरोघरी, नेत जा ग्रंथ घरोघरी, ग्रंथाचा वापर ज्ञानात भर, ग्रंथ वाचायचे स्पर्धेत टिकायचे अशा प्रकारचे विविध फलक घेऊन युवक-युवती मोठ्या संख्येने ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.

Web Title: The book turns the man's life into turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.