कामगार नोंदणी अर्जावर बोगस सही, शिक्क्यांच्या वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:18+5:30
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगार नोंदणी केली जात आहे. यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात ग्रामीण तर शहरासाठी नगर परिषद कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी नगर परिषदेत काही व्यक्ती कामगारांना अर्ज भरून देण्याचे काम करीत आहेत.

कामगार नोंदणी अर्जावर बोगस सही, शिक्क्यांच्या वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा त्यांना लाभ मिळावा यासाठी कामगार नोंदणी केली जात आहे. यांतर्गत नगर परिषदेत शहरी भागातील कामगारांचे अर्ज स्वीकार केले जात आहेत. यात मात्र बोगस सही व शिक्क्यांचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासन अद्याप गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगार नोंदणी केली जात आहे. यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात ग्रामीण तर शहरासाठी नगर परिषद कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी नगर परिषदेत काही व्यक्ती कामगारांना अर्ज भरून देण्याचे काम करीत आहेत.
या अर्जात कंत्राटदाराचा शिक्का व त्यांची सही असलेला अर्ज नगर परिषदेतील बांधकाम विभागातील एका अभियंत्यांकडे द्यायचा आहे. मात्र काही अर्जांवर नगर परिषद कनिष्ठ अभियंत्यांचा शिक्का व त्यावर बोगस सही मारण्यात आल्याचे नगर परिषद अभियंत्यांच्या लक्षात आल्याची माहिती आहे. यातूनच अर्जावर संबंधित व्यक्ती परस्पर बोगस सही व शिक्के मारून अर्ज पाठवित असल्याचा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट होत असून याबाबत नगर परिषदेत चर्चा सुरू आहे. संबंधित अभियंत्यांकडून एक-दोनच असे अर्ज निदर्शनास आल्याचे बोलले जात आहे.
मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास आणखीही अर्ज मिळतील असे नगर परिषदेतच बोलले जात आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासन मात्र गप्प बसून आहे.
अर्जासाठी घेतले जातात पैसे
योजनांचा लाभ मिळणार या आशेने कामगार नोंदणीसाठी नगर परिषद कार्यालयात गर्दी करीत आहेत. नेमका याचाच फायदा घेत काही व्यक्तींकडून या गरीब कामगारांकडून पैसे उकळले जात असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेत याबाबत उघड चर्चा सुरू आहे. याची सखोल चौकशी केल्यास काहीतरी नक्कीच हाती येणार किंवा गरीब कामगारांची होत असलेली लूट थांबेल.
या प्रकाराबाबत माहिती नाही.मात्र प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल. असे प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाईल.
- चंदन पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया.