महिलेची हत्या करून मृतदेह पुंजण्यात जाळला
By Admin | Updated: November 17, 2014 22:55 IST2014-11-17T22:55:27+5:302014-11-17T22:55:27+5:30
काटी, कासा येथील रहिवासी असलेल्या फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेची अज्ञात इसमांनी हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह शेतातील धानाच्या पुंजण्यात जाळण्यात आला.

महिलेची हत्या करून मृतदेह पुंजण्यात जाळला
कासा येथील घटना : अंतर्गत वाद की अत्याचारानंतरचे कृत्य?
रावणवाडी : काटी, कासा येथील रहिवासी असलेल्या फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेची अज्ञात इसमांनी हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह शेतातील धानाच्या पुंजण्यात जाळण्यात आला. ही हत्या नेमकी कशातून घडली याचा उलगडा होऊ शकला नाही.
मृतक फुलवंता काटी येथील आठवडी बाजारातून खरेदी करून परत घरी जात असताना सुखदास पांचे यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यात मारेकऱ्यांनी तिचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिला जीवंत जाळले नसून गळा आवळून हत्या करण्यात आली आणि नंतर तिला जाळण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, फुलवंता शिवचरण जमरे ही महिला रविवारी आठवडी बाजार करून काटी येथे घरी परत येत असताना कासा मार्गाच्या ४०० मिटर आत असलेल्या शेतात ही घटना घडली. शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लागली असल्याचे पाहून पप्पू जमरे यांनी सुखदास पाचे यांना धानाच्या पुंजण्यात आग लागली असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. पाचे यांनी घटनास्थळी पोहोचून पुंजण्याची आग विझवण्यासाठी गोंदिया येथील अग्निशमन विभागाला पाचारण केले. सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान अग्निशामक दल घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा कामी लागले असता धानाच्या पुंजण्यात महिलेचे दोन पाय दिसले. त्यामुळे हे वार्ता पूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकरी घटनास्थळी गोळा झाले असता फुलवंता या महिलेचा तो मृतदेह असल्याचे काही जणांनी ओळखले. लगेच रावणवाडी पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक पि. निंबाळकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.
घटनास्थळावर फुलवंता जमरे हिची चप्पल, भाजीपाला, खाद्यतेल आणि इतर जीवनोपयोगी वस्तू घटनास्थळावर विखुरलेल्या स्वरूपात अस्तव्यस्त पडून होत्या. शेतात पूर्ण धानाचे सहा पुंजणे होते. काही धानाचे भारे खाली पडले होते. त्याच धानाचा भाऱ्यावर फुलवंताचे प्रेत ठेऊन जाळण्यात आले.
मृत फुलवंताला एक मुलगा देवराज आणि एक मुलगी डिलेश्वरी आहे. या घटनेत महिलेचा तर मृत्यू झालाच मात्र सुखदास पाचे यांचेही ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच रावणवाडी ठाण्याचे निरीक्षक यांनी या घटनेचा तपास करून आरोपींचा शोध लावण्यासाठी चार-चार कर्मचाऱ्यांची चमू गठीत करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी घटनास्थळी हजर होऊन घटनास्थळाचे निरीक्षण केले व तपासासाठी दिशानिर्देश दिले. (वार्ताहर)