नदीत बुडालेल्या त्या चार मुलांचे मृतदेह २४ तासांनंतर मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST2021-09-09T04:35:39+5:302021-09-09T04:35:39+5:30
नरेंद्र कावळे - राजीव फुंडे आमगाव : राज्यभरात सोमवारी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. परंतु तालुक्यात ...

नदीत बुडालेल्या त्या चार मुलांचे मृतदेह २४ तासांनंतर मिळाले
नरेंद्र कावळे - राजीव फुंडे
आमगाव : राज्यभरात सोमवारी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. परंतु तालुक्यात मात्र सणाला गालबोट लागले आहे. तान्हा पोळ्याच्या दिवशी मंगळवारी (दि. ७) गावातील काही मुले मारबत विसर्जनासाठी गावातील शिवारात गेली व बाजूला असलेल्या वाघ नदीवर आंघोळीसाठी गेले असता चार मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. कालीमाटी गावात तान्हा पोळ्याच्या दिवशीच ही दुःखद घटना घडली. अखेर तब्बल २४ तासांनंतर पोलीस प्रशासन व महसूल विभागाला यश आले असून स्थानिक मासेमार व शोधकार्य करणाऱ्या पथकाने मयूर अशोक खोब्रागडे (२१), संतोष अशोक बहेकार (१९), रोहित नंदकिशोर बहेकार (१७), सुमित दिलीप शेंडे (१८) यांचे मृतदेह शोधून काढले.
तालुक्यातील कालीमाटी गावातील काही मुले तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत विसर्जनासाठी गाव शिवारात गेले. मारबत विसर्जनानंतर कडेला नदी असल्याने नदीत आंघोळीचा मोह आवरता आला नाही आणि सर्व मुले नदीत आंघोळीसाठी उतरली. काही मुले काठावर आंघोळ करू लागली तर ७-८ मुले आंघोळीसाठी अजून आत गेली. काठावरील मुले आंघोळीनंतर बाहेर आली. आत उतरलेल्या मुलांपैकी ३ मुलेही बाहेर आली त्याचवेळी ४ मुले पाण्यात वाहू लागली. काही मुलांनी तिथेच मदतीसाठी हाक दिली तर काही मुलांनी गावात येऊन सर्व व्यथा सांगितली. परंतु तोपर्यंत उशीर झाल्याने गावातील ४ मुले वाहून गेली. माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासन लगेच घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मासेमार व शोधकार्य करणाऱ्या पथकाने या मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले.
रात्री उशिरापर्यंत कुठलाच पत्ता न लागल्याने गावात शोककळा पसरली होती. अखेर २४ तासांनंतर मृतदेह हाती लागले. सर्व मुले ११ वी व १२ वीला शिकत होती. सर्व मृतदेह शवविच्छेदनाकरिता येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सणाचा दिवस दुःखात बदलला. प्रत्येक जण या घटनेवर दुःख व्यक्त करीत होते.
-------------------------
शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मृतांच्या नातेवाइकांना पैशांची मागणी
चारही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणले असता शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मृतांच्या नातेवाइकांकडून पैशांची मागणी केली. पैसे दिल्यानंतरही कमी पैसे दिले म्हणून नातेवाइकांसोबत अरेरावी केल्याचे चित्र दिसून आले. संबंधित विभागाकडे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
----------------
आमदार कोरोटे यांनी दिली कुटुंबीयांना भेट
कालीमाटी येथील ४ कुटुंबांवर संकट कोसळले आहे. यादरम्यान आमदार कोरोटे यांनी प्रत्यक्ष कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीच्या वेळेला उपस्थित राहून कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. यादरम्यान ओबीसी काँग्रेस सेलचे अध्यक्ष विजय हुकुमचंद बहेकार, नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, संजय बहेकार, लक्ष्मण तावाडे, उपसरपंच प्रशांत बहेकार, पुरुषोत्तम चूटे, राजीव फुंडे उपस्थित होते.