नोकरीसाठी भटकतोय अंध लखन
By Admin | Updated: April 24, 2017 00:31 IST2017-04-24T00:31:57+5:302017-04-24T00:31:57+5:30
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लखन कोरे मागील एक ते दीड वर्षापासून नोकरीच्या शोधात भटकंत आहे.

नोकरीसाठी भटकतोय अंध लखन
पालकमंत्र्यांचे निर्देशही डावलले : आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून टाळाटाळ
साखरीटोला : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लखन कोरे मागील एक ते दीड वर्षापासून नोकरीच्या शोधात भटकंत आहे. मात्र लखनच्या आयुष्यात अंधाराशिवाय काहीच दिसत नाही. नोकरीच्या रुपाने प्रकाश किरणांची आस लावून बसलेल्या लखनला लोकप्रतिनिधीपासून ते अधिकारी वर्गापर्यंत केवळ पोकळ आश्वासने मिळाली. त्यामुळे आयुष्य कसे जगावे? असा प्रश्न लखनपुढे निर्माण झाला आहे. नोकरी नसल्याने त्याच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. मात्र अधिकाऱ्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नाही.
साखरीटोल्यापासून ३ कि.मी. अंतरावरील कन्हारटोला ता. आमगाव येथील लखन सुखदेव कोरे हा बॅरी.राजाभाऊ कला कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेला तरुण. दोन्ही डोळ्याची अंध आहे. आई-वडीलांना लखन एकटाच मुलगा. आई नेहमी आजारी असते. शेती मोजकीच असल्यामुळे घरात अठराविश्व दारिद्र्य आहे. आईला ब्लडकॅन्सर असल्याने उपचार करु शकत नाही. काही महिन्यापूर्वी पुणे येथील टेक्नीकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संख्येत आॅपरेटरची ट्रेनिंग केली. त्यानंतर त्यावेळचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या प्रयत्नाने देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात टेलीफोन आॅपरेटर म्हणून ५००० रुपयांची नोकरी मिळवून दिली. त्यासाठी लखन रोज ५० कि.मी. अपडाऊन करायचा. सदर नोकरीत लखनचे घर कसेबसे चालत होते. मात्र काही महिन्यानंतर लखनला नोकरीतून काढण्यात आले.
नोकरी गेल्यानंतर अंध लखनची नोकरीसाठी फरकट सुरू झाली. त्यासाठी तो सध्याचे जिल्हाधिकारी यांना भेटला. क्षेत्राचे आ.संजय पुराम यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली. मात्र आश्वासना पलिकडे काहीही मिळाले नाही. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना भेटला. पालकमंत्र्यानी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लखनला नोकरी देण्याचे निर्देश दिले. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या निर्देशालाही दाद दिली नाही. प्रकल्प अधिकारी देवरी यांनी लखनला नोकरी देण्याचे सौजन्य दाखविले नाही. १५ आॅक्टोबर २०१६ च्या पत्रानुसार लखनला एकात्मिक आदिवासी प्रकल्प देवरी येथे रुजू करुन घेणे आवश्यक असताना लखनला आजपर्यंत नोकरीसाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. १ एप्रिलपर्यंत नोकरीवर रुजू करुन घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिना संपण्याच्या मार्गावर आला असूनही घेतले नाही.