अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू
By Admin | Updated: October 14, 2015 02:27 IST2015-10-14T02:27:52+5:302015-10-14T02:27:52+5:30
वनपरिक्षेत्र कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत सहवनक्षेत्र कोहमारातील देवपायलीनजीक रात्री अंदाजे २ वाजतादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत ....

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू
सडक-अर्जुनी : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत सहवनक्षेत्र कोहमारातील देवपायलीनजीक रात्री अंदाजे २ वाजतादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अस्वलाचा जागीच मृत्यू झाला. या अस्वलाचा समोरील एक पंजा चोरट्यांनी कापून नेला आहे, हे विशेष.
देवपायली ते डुग्गीपार या वनालगत असलेल्या कम्पार्टमेंट नं. ४६४४७१७ मध्ये हा अपघात घडला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यासनंतर मृत अस्वलाचा पंचनामा करून अर्जुनी-मोरगावचे पशुधन अधिकारी डॉ.कापगते यांनी शवविच्छेदन केले.
सदर अस्वलाला नंतर डोंगरगाव/डेपो मध्ये जाळण्यात आले. यादरम्यान कोहमाराचे वनक्षेत्र सहायक डी.जी. चव्हाण, वनरक्षक वासुदेव गहाने, शिवा तांडेकर, अरविंद बडगे, बंडू चव्हाण, विक्की चव्हाण, वनमजूर भरत बहेकार, रमेश मेश्राम, रपेश लंजे, भोजराज राखडे, किशोर बडवाईक यांनी सहकार्य केले.
राष्ट्रीय महामार्ग हा नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच प्राण्यांचे जीव जातात. या मार्गावर रात्रीच्या वेळी रानडुकरे नेहमीच मरतात पण त्याची दखल घेतल्या जात नाही. लगतच्या गावातील रानडुकराचे मांस खाणारे शौकिन पूर्ण रानडुक्कर घेऊन जातात. पण त्यांच्यावरही वनविभागाकडून कारवाई होत नाही. (शहर प्रतिनिधी)