सुरक्षा ठेव परत न करणाऱ्या एमआयडीसीला चपराक
By Admin | Updated: November 20, 2014 22:54 IST2014-11-20T22:54:15+5:302014-11-20T22:54:15+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्याने ग्राहक प्रमोद हरिशचंद्र अग्रवाल रा.मनोहर चौक गोंदिया यांनी ग्राहक तक्रार

सुरक्षा ठेव परत न करणाऱ्या एमआयडीसीला चपराक
ग्राहक मंचचा निर्णय : २९ हजार रुपये व्याजासह द्यावे
गोंदिया : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्याने ग्राहक प्रमोद हरिशचंद्र अग्रवाल रा.मनोहर चौक गोंदिया यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. यावर न्यायमंचाने दोन्ही पक्षांच्या सबबी एकूण सदर महामंडळाने ग्राहकाला नऊ टक्के व्याजासह २९ हजार ८१५ रूपये देण्याचे आदेश दिले.
प्रमोद अग्रवाल हे राईस मिलचे मालक आहेत व औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरातील राईस मिलच्या आवारात असलेल्या सदनिकेत राहतात. तेथील कर्मचाऱ्यांना सदर महामंडळाकडून पाणी पुरवठा केला जातो. शिवाय अग्रवाल यांचे कार्यालयसुद्धा त्याच परिसरात असल्याने ते स्वत:साठी व इतर लोकांसाठी पाण्याचा वापर करतात. मात्र मिल बंद झाल्यामुळे तेथील कर्मचारी इतरत्र गेले व डिसेंबर २०१२ मध्ये पाणी पुरवठा बंद झाला. अग्रवाल यांनी वेळोवेळी पाणी पुरवठ्याच्या जोडणीच्या सुरक्षा ठेवी एकूण २९ हजार ८१५ रूपये भरले. यानंतर ९ डिसेंबर २०१२ रोजी सुरक्षा ठेव परत मागितले. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतरच अग्रवाल यांना रदर रक्कम परत देण्यात येईल, असे सांगून न देण्याचे कसलेही कारण सांगितले नाही.
ग्राहक न्यायमंचने आपल्या कारणमिमांसेत सदर महामंडळ व्यवसायाकरिता पाणी पुरवठा केला जात होता. त्यासाठी सुरक्षा ठेवी भरल्याच्या पावत्यांची तपासणी केली. सुरक्षा ठेव परत करण्यासंबंधीचे महामंडळाचे अग्रवाल यांना पाठविलेले पत्र, नवीन भूखंडावरील नवीन नळ जोडणीसाठी नव्याने सुरक्षा ठेवीचे महामंडळाचे पत्र व सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्यासाठीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे मंजुरी व शोधनासाठी सादर करण्यात आल्याचे अग्रवाल यांना कळविले. त्यावरून सुरक्षा ठेव अद्याप परत करण्यात न आल्याचे सिद्ध झाले. शिवाय अग्रवाल यांनी सदर महामंडळाकडे सुरक्षा ठेव परत मिळण्यासाठी वेळोवेळी केलेल्या लेखी व तोंडी विनंत्या व त्याविषयीचे पत्र आदी बाबींवरून महामंडळाच्या सेवेतील त्रुटी सिद्ध होत असल्याचे सांगितले. यावरून ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पाणी पुरवठ्याची सुरक्षा ठेव २९ हजार ८१५ रूपये दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने रक्कम मिळेपर्यंत द्यावे, शिवाय तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपये द्यावे, आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये द्यावे असा आदेश दिला आहे.(प्रतिनिधी)