गोंदियात नळातून काळे पाणी
By Admin | Updated: November 6, 2014 22:57 IST2014-11-06T22:57:09+5:302014-11-06T22:57:09+5:30
कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन महिन्यांपासून नळांद्वारे काळ्या रंगाचे दूषित पाणी निघत आहे. या प्रकाराची माहिती रूग्णालय प्रशासनाला देण्यात आली, परंतु ही समस्या दूर झालेली नाही.

गोंदियात नळातून काळे पाणी
गोंदिया : कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन महिन्यांपासून नळांद्वारे काळ्या रंगाचे दूषित पाणी निघत आहे. या प्रकाराची माहिती रूग्णालय प्रशासनाला देण्यात आली, परंतु ही समस्या दूर झालेली नाही.
प्रामुख्याने जिथे जिल्हा शल्य चिकित्सकांचे कार्यालय आहे, त्याच भवनाच्या मागील बाजूला नळ लागलेला आहे. तेथून दूषित पाणी निघत आहे. या नळाचे पाणी रूग्णालय परिसरातील एका टाकीत जमा होते व नंतर ते पाणी रूग्णालयात सर्वत्र वितरित होते. याच पाण्याचा उपयोग करून रुग्णालयातील भोजन तयार केले जाते. रूग्ण व त्यांचे कुटुंबीय याच पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. या प्रकारामुळे त्या रूग्णांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
ज्या ठिकाणी नळ लागलेला आहे व पाण्याची टाकी आहे, तिथे जवळच रूग्णालयात कार्यरत काही कर्मचाऱ्यांचे क्वॉर्टर आहेत. येथे उपस्थित महिलांनी सांगितले की, ते या पाण्याचा उपयोग करीत नाही. परंतु जवळच एक विहीर आहे. त्या तिथून पाणी आणतात. सदर नळ नगर परिषदेच्या वतीने लावण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या पाणी पुरवठा विभागाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे गोंदिया नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा इथे पुन्हा एकदा प्रत्यय येत आहे.
महिला आपल्या कुटुंबांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या पाण्याचा उपयोग करीत नसल्या तरी जे लोक बाहेरून उपचारासाठी येतात त्यांचे नातेवाईक नवीन संक्रामक आजार तर आपल्या बरोबर घेवून जात नाही ना? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)