एसटी बसचे वेळापत्रक ठरविते काळी-पिवळी टॅक्सी
By Admin | Updated: May 17, 2014 23:46 IST2014-05-17T23:46:58+5:302014-05-17T23:46:58+5:30
गोरगरिबांची एसटी बस अशी ग्रामीण व शहरी भागात एसटी बसची ओळख आहे. तोट्यात चाललेल्या एसटी बसला नफ्यात आणण्यासाठी महाराष्टÑ राज्य परिवहन मंडळ

एसटी बसचे वेळापत्रक ठरविते काळी-पिवळी टॅक्सी
गोंदिया : गोरगरिबांची एसटी बस अशी ग्रामीण व शहरी भागात एसटी बसची ओळख आहे. तोट्यात चाललेल्या एसटी बसला नफ्यात आणण्यासाठी महाराष्टÑ राज्य परिवहन मंडळ विविध योजना राबवित आहेत. तर एसटी महामंडळाचेच काही अधिकारी व कर्मचारी एसटी बसला हात दाखवित असल्याने एसटी बस नफ्यात चालण्याऐवजी तोट्यात जात आहे. तर गोंदियात चक्क एसटी बसेसचे वेळापत्रक काळी-पिवळी चालकांच्या इशारावरून ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया बस स्थानकावरून दररोज शंभराहून अधिक बसेस सोडल्या जातात. साधारणपणे लोकांच्या वर्दळीची वेळ सकाळी ७ व दुपारी ११ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळात असते. याच कालावधीत कर्मचारी, अधिकारी व रोजंदारी कामगार व अन्य नागरिक आपल्या कामासाठी निघतात. त्यामुळे हे नागरिक ये-जा करण्यासाठी पहिली पसंती एसटी बसला देतात. मात्र सकाळीच्याच वेळेत एसटी बसेस राहत नसल्याने नागरिकांना इच्छा नसतानाही काळी-पिवळी टॅक्सीमधून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील बसस्थानकावर पुर्णपणे काळी-पिवळी चालकांनी अतिक्रमण केले आहे. पहाटे ६ वाजतापासून या बसस्थानकासमोर काळी पिवळी गाड्यांची रांग लागलेली असते. तर एसटी बसेसचा पत्ताच नसतो. त्यामुळे हे बसस्थानक काळी-पिवळी चे की एसटी बसचे असा प्रश्न बरेचदा प्रवाश्यांना पडतो. विशेष म्हणजे ज्या कालावधीत एसटी बसचा वेळा असायला हव्या त्याच वेळात एसी बसेस नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. येथील जयस्तंभ चौकातील बसस्थानकावरून सुटणार्या काळी-पिवळींची संख्या व एसटी बसेसची संख्या लक्षात घेतली तर निश्चितच काळी-पिवळीची संख्या एसटी बसेसपेक्षा जास्त असून एसटी बस पेक्षा या काळी-पिवळी चालकांना अधिक प्रवाशी मिळतात. याचे कारण देखील तसेच असल्याचे बोलल्या जाते. काही काळी-पिवळी टॅक्सी चालकांनी व एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाने महाराष्टÑ राज्य परिवहन मंडळाच्या काही अधिकार्यांशी हातमिळवणी करून एसटी बसेसच्या वेळा प्रवाशांची संख्या ज्या वेळेस अधिक असते त्या वेळेस न ठेवता त्यात बदल केल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे एसटीला ज्यावेळेस प्रवाशी मिळतात त्याच वेळेस एसटी बसेसच्या फेर्या नसल्याने प्रवाश्यांना मनात नसताना देखील आपला जिव धोक्यात घालून या काळी-पिवळी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये देखील काही प्रमाणात नाराजीचा सुर आहे. एकंदरीत परिस्थितीवरून गोंदियातील एसटी बसेसचे वेळापत्रक काळी-पिवळी टॅक्सी ठरवीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एकीकडे एसटी महामंडळ प्रवाशांसाठी विविध योजना राबवून एसटीकडे प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे याच विभागातील काही अधिकारी एसटीलाच हात दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याने एसटी नफ्यात येण्याऐवजी तोट्यात चालली असल्याचे चित्र दिसून येत आहे. एसटी बसेसच्या वेळा या प्रवाश्यांच्या सोयीच्या वेळेस ठेवण्यात याव्या, अशी मागणी देखील आता प्रवाशांनी केली आहे.आगार प्रमुखांनी याकडे लक्ष घलण्यची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)