एकहाती सत्तेचे भाजपचे स्वप्न भंगले

By Admin | Updated: March 12, 2016 01:58 IST2016-03-12T01:58:04+5:302016-03-12T01:58:04+5:30

नगर परिषदेचे सर्व सभापती निवडून आणण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न अखेर भंगले. मात्र पाचपैकी तीन सभापतिपद पटकावण्यात भाजपला यश आले.

BJP's dream of unbroken power dissolves | एकहाती सत्तेचे भाजपचे स्वप्न भंगले

एकहाती सत्तेचे भाजपचे स्वप्न भंगले

कॉंग्रेसच्या इटानकर अविरोध : भाजपला तीन तर शिवसेनेकडे एक सभापतीपद
गोंदिया : नगर परिषदेचे सर्व सभापती निवडून आणण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न अखेर भंगले. मात्र पाचपैकी तीन सभापतिपद पटकावण्यात भाजपला यश आले. कॉंग्रेसच्या एका सभापतीची अविरोध निवड झाल्याने भाजप- शिवसेना व कॉंग्रेस असे सभापतिपदांचे वाटप झाले. दुसरीकडे हातातील सत्ता गेल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादीला झटका बसला. यासोबतच काँग्रेस-राकाँ गटाशी जवळीक साधलेल्या अपक्ष विष्णू नागरीकर यांना भाजपने आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले असले तरी ऐनवेळी अर्ज रद्द झाल्याने नागरिकर यांना ‘जोर का झटका’ अधिकच जोरात बसला.
या निवडणुकीत बांधकाम समिती सभापतिपदी जितेंद्र पंचबुद्धे, पाणी पुरवठा समिती सभापतिपदी श्रद्धा नाखले, नियोजन व विकास समिती सभापतिपदी शोभा चौधरी, महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी लता रहांगडाले यांची निवड झाली, तर शिला इटानकर अविरोध निवडून आल्या.
नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शुक्रवारी (दि.११) सभापतींची निवडणूक घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव व मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया झाली. पालिकेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असले तरीही राष्ट्रवादीचे गटनेता पंकज यादव व त्यांचे भाऊ लोकेश यादव या निवडणुकीत उपस्थित राहू शकत नाही. नेमकी हीच संधी साधून भारतीय जनता पक्षाने संपूर्ण सत्तेसाठी खेळी केली.
भाजपने सोबत असलेल्या शिवसेनेसह अपक्ष सदस्य विष्णू नागरीकर यांना सोबत घेतले. यात त्यांचे संख्याबळ वाढल्याने भाजपची संपूर्ण सत्तेची वाटचाल सुरू होती. मात्र नागरीकर यांचा अर्ज रद्द झाल्याने त्यांच्या विरोधात असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार शिला इटानकर या अविरोध निवडून आल्या. परिणामी संपूर्ण सत्तेचे भाजपचे स्वप्न येथे येऊन भंगले.
पाच विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे तीन, कॉंग्रेसचा एक व शिवसेनेचा एक सभापती निवडून आला. निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्हीप काढण्यात आले होते. (शहर प्रतिनिधी )

खुर्चीसाठी भाजपात वाद
भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट होताच भाजपच्या गटात आनंद कमी मात्र सभापतिपद कुणाला मिळणार याला घेऊन टेंशन जास्त होते. विशेष म्हणजे सभापतिपद आम्हाला मिळावे यासाठी सदस्यांचे आपसातच वाद होतानाही दिसले. कुणी स्वत:साठी तर कुणी आपल्या पत्नीसाठी पक्षातील वरिष्ठांसोबत वाद घालत होते. यातून सत्तेसाठी आपसात होत असलेला तमाशाही पालिकेत बघावयास मिळाला.

अशी झाली निवडणूक
निवडणुकीत बांधकाम समिती सभापतीपदासाठी भाजपकडून जितेंद्र पंचबुद्धे तर राष्ट्रवादीकडून मनोहर वालदे, शिक्षण सभापतीसाठी कॉंग्रेसच्या शिला इटानकर व भाजपकडून विष्णू नागरीकर, पाणी पुरवठा सभापतीसाठी राष्ट्रवादीच्या आशा पाटील व भाडपकडून श्रद्धा नाखले (अग्रवाल), नियोजन व विकास समिती सभापतीसाठी कॉंग्रेसच्या अनिता बैरिसाल व भाजपकडून शोभा चौधरी तर महिला व बाल कल्याण सभापतीसाठी राष्ट्रवादीच्या ममता बंसोड व शिवसेनेकडून लता रहांगडाले यांचा अर्ज होता.
सहा विरूद्ध पाच मतांनी बांधकाम समिती सभापतिपदी जितेंद्र पंचबुद्धे, पाणी पुरवठा समिती सभापतिपदी श्रद्धा नाखले, नियोजन व विकास समिती सभापतिपदी शोभा चौधरी, महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी लता रहांगडाले यांची निवड झाली. शिला इटानकर मात्र अविरोध निवडून आल्या. स्थायी समितीत राष्ट्रवादीचे खालीद पठाण, शिवसेनेचे राजकुमार कुथे व भापजचे राहूल यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: BJP's dream of unbroken power dissolves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.